देवेंद्र फडणवीसांच्या शासकीय निवासस्थानी भाजप नेत्यांची बैठक, नेमकं काय चर्चा झाली? : वाचा सविस्तर

मराठवाड्यातील पूरस्थितीला फडणवीस सरकारच्या काळातील जलयुक्त शिवार योजना कारणीभूत असल्याचा आक्षेप घेत याबाबत चौकशीची मागणी काही पर्यावरण तज्ज्ञ करत आहेत. त्यानंतर  राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवास स्थान सागर बंगल्यावर भाजप नेत्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली.

  मुंबई : मराठवाड्यातील पूरस्थितीला फडणवीस सरकारच्या काळातील जलयुक्त शिवार योजना कारणीभूत असल्याचा आक्षेप घेत याबाबत चौकशीची मागणी काही पर्यावरण तज्ज्ञ करत आहेत. त्यानंतर  राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवास स्थान सागर बंगल्यावर भाजप नेत्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने देशात विधानसभा पोटनिवडणुकांची घोषणा केली असून त्यात मराठवाड्यातील देगलूर बिलोली मतदारसंघात पोट निवडणूक होणार आहे त्या संदर्भात या बैठकीचे आयोजन असल्याचे सांगण्यात येत आहे.

  बैठकीला मराठवाड्यातील पदाधिकारी उपस्थित

  त्याच बरोबरीने मराठवाड्यात निर्माण झालेल्या अतिवृष्टी आणि पूर स्थितीचा आढावा देखील घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.  या बैठकीला भाजपचे प्रमुख पदाधिकारी तसेच मराठवाड्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. राज्य सरकारने मराठवाड्यात तातडीने मदत द्यावी अशी मागणी फडणवीस यानी कालच व्टिट करत केली होती. राज्य सरकारने आता शाब्दिक दिलासा न देता प्रत्यछ मदत तातडीने कशी देता येईल याबाबत नियोजन करावे  अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती.

  पूरस्थितीला जलयुक्त शिवारच्या चुकीच्या कामे जबाबदार

  दरम्यान मराठवाड्यात गेल्या काही दिवसांत निर्माण झालेल्या पूर स्थितीला फडणवीस सरकारच्या काळात करण्यात आलेल्या जलयुक्त शिवारच्या चुकीच्या कामे जबाबदार आहेत असे सांगत काही जलतज्ज्ञांनी या कामांच्या चौकशीची मागणी केली आहे. पर्यावरण तज्ज्ञांनी फडणवीसांच्या योजनेवर पुन्हा प्रश्नचिन्ह लावले असून मराठवाड्यातील सध्याच्या स्थितीत मदत देता येणे शक्य नसल्याने दिशाभूल करण्यासाठीअश्या प्रकारच्या वावड्या निर्माण केल्या जात असल्याचे मत भाजपच्या वर्तुळात व्यक्त केले जात आहे. फडणवीस यांच्या आज तातडीने मराठवाड्यातील स्थितीबाबत बोलावलेल्या बैठकीला या नव्या मुद्यांचा संदर्भ असल्याचे या सूत्रांनी सांगितले.

  नैसर्गिक प्रवाहाला अडथळा

  जलयुक्त शिवाराच्या कामात मोठ्या प्रमाणात नद्यांशी छेडछाड केल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याचा आरोप पर्यावरणतज्ञ अतुल देऊळगावकर यांनी केला आहे. जलयुक्त शिवार यांच्या कामाची चौकशीची मागणी पर्यावरण तज्ञ अतुल देऊळगावकर यांनी केली आहे. अतुल देऊळगावकर म्हणाले, “जलयुक्त शिवारच्या कामात नद्यांशी छेडछाड केली गेली. नदीचं रुंदीकरण, खोलीकरण, सरळीकरण करताना नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण करण्यात आला. ते म्हणाले की,महाराष्ट्रातील नामवंत जलतज्ज्ञ पोपटराव पवार, विजय बोराडे, प्रदीप पुरंदरे या सर्वांनी सांगितले होते की नदीशी छेडछाड करु नका. आता त्याची फळे भोगत आहोत.

  पूर येण्याला जलयुक्त योजना हे एक कारण

  ज्येष्ठ जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनीही मराठवाड्यातील पूरस्थितीच्या कारणांपैकी जलयुक्त शिवार एक कारण असल्याचे म्हटले आहे. मराठवाड्यात आलेला पूर जलयुक्त शिवार योजनेमुळे आला असे म्हणता येणार नाही, मात्र पूर येण्याला जलयुक्त शिवार योजना हे एक कारण आहे. जलयुक्त शिवार योजनेची कामे चुकीच्या पद्धतीने झाली. अतिखोलीकरण ,रुंदीकरण यामुळे कामात तांत्रिक चुका मोठ्या प्रमाणावर झाल्या. मी आधीपासूनच या कामांवर आक्षेप घेतला होता. मात्र सरकारने केलेल्या चुकांमुळे ही परिस्थिती उद्भवली, असे प्रदीप पुरंदरे यानी म्हटले आहे.

  देऊळगावकरांना मनोरुग्णालयात पाठवा

  दरम्यान, अतुल देऊळगावकर यांनी महापुरासाठी जलयुक्त शिवार योजनेकडे बोट दाखवल्यानंतर, देऊळगावकर यांना मनोरुग्णालयात पाठवा, जलयुक्त शिवार चांगली योजना आहे, असे भाजप नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे  यानी म्हटले आहे. भाजप आमदार प्रशांत बंब यांनीही जलयुक्त शिवार योजनेवरील आरोप फेटाळले. जलयुक्त शिवार योजनेचा पूरपरिस्थितीशी काहीही संबंध नाही. मराठवड्यातली पूरपरिस्थिती ही बेसुमार वाळू उपश्यामुळे झाली आहे. जलयुक्त शिवार योजना ही दुष्काळात मदत करणारी योजना आहे, असे प्रशांत बंब यानी म्हटले आहे.