रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक ; वेळापत्रक पाहा आणि मगच रिस्क घ्या

उद्या (रविवार) २७ डिसेंबर असून रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक ( Megablock ) असणार आहे. परंतु कोणत्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे ते आपण जाणून घेऊयात...

मुंबई : रेल्वे प्रवाशांसाठी लोकलच्या(Local) तिन्ही मार्गावरचं वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलंय. त्यामुळे बाहेर कुठेही फिरायला जाण्याआधी एकदा वेळापत्रक नक्की पाहा आणि मगच रिस्क घ्या. आज (रविवार) २७ डिसेंबर असून रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक ( Megablock ) असणार आहे. परंतु कोणत्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे ते आपण जाणून घेऊयात…

मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक (Central Railway)

मुंबई विभागातील मध्य रेल्वे मार्गावर आज २७ डिसेंबरला मेगाब्लॉक संचालीत करण्यात आला आहे. सर्वप्रथम माटुंगा – मुलुंड अप व डाऊन जलद मार्गांवर सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० पर्यंत असणार आहे. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.१३ पर्यंत सुटणाऱ्या जलद सेवा माटुंगा येथे डाउन धीम्या मार्गावर वळविल्या जातील.

शीव ते मुलुंड दरम्यान सर्व स्थानकांवर थांबून मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील व निर्धारित गंतव्यस्थानी वेळापत्रकापेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. ठाणे येथून सकाळी १०.०४ ते दुपारी ३.२६ पर्यंत सुटणाऱ्या जलद मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप स्लो मार्गावर वळवल्या जातील आणि मुलुंड ते दादर या सर्व स्थानकांवर थांबून परळ येथे अप जलद मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील आणि नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक (Harbour Railway)

पनवेल-वाशी अप व डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ या वेळेत (बेलापूर / नेरुळ-खारकोपर मार्गासह) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईच्या दिशेने (पनवेल / बेलापूरहून) सकाळी १०. ४९ ते दुपारी ४.०१ पर्यंत अप हार्बर मार्गावरील सेवा आणि (पनवेल / बेलापूरकडे ) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.०३ ते दुपारी ३.१६ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेलहून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.३३ या वेळेत ठाणेकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० पर्यंत पनवेल/बेलापूर डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – वाशी विभागात विशेष गाड्या चालविण्यात येतील. ब्लॉकच्या कालावधीत ठाणे- वाशी स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असतील.

पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बोब्लॉक (Western Railway)

पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बोब्लॉक असणार आहे. यामध्ये बोरिवली ते गोरेगाव अशा अप आणि डाऊन मार्गावरील जलद गतीने धावणाऱ्या ट्रेन धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. बोरिवली-गोरेगाव अप आणि डाऊन मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ पर्यंत जम्बोब्लॉक असणार आहे.