मुंबई, औरंगाबाद, नाशिक, पुणे, नागपूर, नाशिक अशा मोठ्या शहरांसह राज्यातल्या अनेक शहरातील हजारो सोसायट्यांचा डीम्ड कन्व्हेअन्स झालेला नाही. त्यामुळे या प्रक्रीयेची माहिती सहज उपलब्ध होण्याबरोबरच ही प्रक्रीया सोपी करण्यासाठी राज्यातील गृहनिर्माण संस्थासाठी १ ते १५ जानेवारी या काळात मानीव अभिहस्तांतरासाठी(डीम्ड कन्व्हेअन्स) विशेष मोहिम राबवण्यात येणार आहे.

मुंबई :  मुंबई, औरंगाबाद, नाशिक, पुणे, नागपूर, नाशिक अशा मोठ्या शहरांसह राज्यातल्या अनेक शहरातील हजारो सोसायट्यांचा डीम्ड कन्व्हेअन्स झालेला नाही. त्यामुळे या प्रक्रीयेची माहिती सहज उपलब्ध होण्याबरोबरच ही प्रक्रीया सोपी करण्यासाठी राज्यातील गृहनिर्माण संस्थासाठी १ ते १५ जानेवारी या काळात मानीव अभिहस्तांतरासाठी(डीम्ड कन्व्हेअन्स) विशेष मोहिम राबवण्यात येणार आहे अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी मंगळवारी दिली.

राज्यात सुमारे ९६ हजारांहून अधिक गृहनिर्माण संस्था आहेत. त्यातील किमान ७६ हजार गृहनिर्माण संस्था मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकमध्ये आहेत. या संस्थांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी मानीव अभिहस्तांतराचा(डीम्ड कन्व्हेअन्स) उपक्रम सरकारने सुरवात केला. कारण इमारत बांधून झाल्यावर बिल्डर जमिनीची मालकी सोसायटीकडे देत नाही. यावर उपाय म्हणून सरकारने बिल्डरशिवाय जमिनीची मालकी गृहनिर्माण संस्थांना देण्याची प्रक्रीया १९३६च्या मोफा कायद्यात बदल करून डीम्ड कन्व्हेअन्सच्या रुपाने सुरु केली.

एखादी इमारत उभी असलेल्या जमीनीचे प्रत्यक्ष कायदेशीर हस्तांतरण सोसायटीच्या नावे होत नाही तोपर्यंत सदनिकाधारक अथवा सहकारी गृहनिर्माण संस्थेला त्या जमिनीची कायदेशीर मालकी मिळत नाही. मुंबईसारख्या शहरात जवळपास ८५ टक्के सोसायट्यांची जमीन अजूनही त्यांच्या मालकीची झालेली नाही. त्यामुळे या विशेष मोहिमेचा फायदा मुंबईसह राज्यातील असंख्य गृहनिर्माण संस्थांना होणार आहे.

या मोहिमेची माहिती व अर्ज संबंधित गृहनिर्माण संस्थाना त्यांच्या विभागातील सहकारी संस्थांच्या जिल्हा उपनिबंधकांच्या कार्यालयात मिळेल. डीम्ड केन्व्हेअन्सचा अर्ज निश्चित केलेल्या नमुन्यात व आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.