उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईलचा गैरवापर, फोनवरुन पुण्यातील बड्या बिल्डरला धमकी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकावरून बांधकाम व्यवसायिकाला फोन करून त्याच्याकडे 20 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट 1 च्या पथकाने ही कारवाई केली.

    पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा मोबाईल क्रमांक वापरून एका मोठ्या बांधकाम व्यावसायिकाला  धमकी देण्यात आली आहे. अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकावरून बांधकाम व्यवसायिकाला फोन करून त्याच्याकडे 20 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट 1 च्या पथकाने ही कारवाई केली. आरोपी एका ॲपद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोबाईल क्रमांक वापरत असल्याचे चौकशीत समोर आले आहे. याआधी सुद्धा असे प्रकार घडला आहे का, याचा पोलीस तपास करतायेत.

    दरम्यान, याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाने बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनाथ भाऊसाहेब चोरमले, सौरभ नारायण काकडे, सुनील उर्फ बाळा गौतम वाघमारे, किरण रामभाऊ काकडे, आकाश शरद निकाळजे, चैतन्य राजेंद्र वाघमारे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी गेल्या काही दिवसांपासून बांधकाम व्यावसायिकाला ॲपद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून धमकीचे फोन करत होते. या प्रकरामुळं सर्वांनाच धक्का बसला आहे.

    ‘मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पीए चौगुले बोलतोय’ असे सांगत होते. वाडेबोलाई येथील जागेचा वाद सोडविण्यासाठी देखील आरोपींना व्यावसायिकाला धमकी दिल्याचे समोर आले आहे. तसेच अजित पवार यांचा पीए बोलतोय असं म्हणून आरोपींनी अजून किती लोकांना गंडवले आहे का, किंवा अजून किती लोकांची फसवणूक केली आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत.