पीक विम्यासंदर्भात आमदार निकोले यांची चिकू उत्पादक शेतकऱ्यांसह कृषी मंत्र्याशी भेट

फळ पिक विम्याच्या हप्त्याची रक्कम रूपये ३०००/- प्रति हेक्टरी वरून एकदम रूपये १८,०००/- प्रति हेक्टरी केली असून ती वाढ अवाजवी असून केवळ पालघर जिल्ह्यासाठी ही अन्यायकारक वाढ आहे. त्यामुळे चिकू बागायतदारांना भरणे शक्य होणार नाही.

  मुंबई : पीक विम्यासंदर्भात चिकू उत्पादक शेतकऱ्यांनी योग्य न्याय देऊ असे प्रतिपादन कृषी मंत्री तथा पालघरचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघांच्या शिष्टमंडळाने माकप डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली भेट शासकीय निवासस्थानी घेतली त्यावेळी ते बोलत होते.

  पिकविम्यात अन्यायकारक वाढ

  यावेळी चिक्कू उत्पादक संघांचे विनायक बारी म्हणाले की, गेल्या २०१३-१४ वर्षापासून चिकू फळाला विम्याचे कवच प्राप्त झाले असून त्याचा फायदा पालघर, रायगड, अहमदनगर जिल्ह्यातील चिकू बागायतदारांना खरीप हंगामामध्ये बुरशीजन्य रोग्यांचा नुकसानीसाठी विमा कवच मिळत आहे. परंतु, यंदा ह्या फळ पिक विम्याच्या हप्त्याची रक्कम रूपये ३०००/- प्रति हेक्टरी वरून एकदम रूपये १८,०००/- प्रति हेक्टरी केली असून ती वाढ अवाजवी असून केवळ पालघर जिल्ह्यासाठी ही अन्यायकारक वाढ आहे. त्यामुळे चिकू बागायतदारांना भरणे शक्य होणार नाही.

  त्या अनुषंगाने कृषी मंत्र्यांनी विशेष लक्ष पुरवावे व होणारा अन्याय ताबडतोब दूर करावा, कारण विम्याचे ट्रिगर ०१ जुलै २०२१ पासून लागू होत असून विमा लाभधारक बागायतदारांना केवळ ०९ दिवसाचा अवधी हप्ता भरण्यासाठी मिळत आहे. तरी हा प्रश्न मंत्र्यांनी गांभीर्याने त्वरीत सोडवावा व आमच्या वरील अन्याय दूर करावा अशी पालघर जिल्ह्यातील चिकू बागायतदार यांच्या वतीने आम्ही करत आहोत असे बारी म्हणाले.

  चिक्कू उत्पादक शेतकऱ्यांना योग्य न्याय देऊ

  कृषी मंत्री तथा पालघरचे पालकमंत्री दादा भुसे म्हणाले की, पीक विम्यासंदर्भात चिक्कू उत्पादक शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळवून देऊ. याप्रसंगी माकप डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघाचे अध्यक्ष विनायक बारी, खजिनदार यज्ञेश सावे, सदस्य अजय पाटील, सदस्य अभिजित राऊत, डॉ. आदित्य अहिरे उपस्थित होते.

  MLA Nikole meets Chiku growers and Agriculture Minister regarding crop insurance