बोरिवलीत भाजप नगरसेविकेच्या संपर्क कार्यालयात महिलेचा विनयभंग; कार्यकर्त्यािवरोधात गुन्हा दाखल

मुंबईतील भाजप महिला नगरसेविका अंजली खेडकर यांच्या संपर्क कार्यालयातच महिलेचा विनयभंग करुन बलात्काराचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बोरिवलीत वॉर्ड क्रमांक १६ राम मंदिर रोड वझीरा नाका येथे अंजली खेडकर यांचे कार्यालय आहे. देशाच्या स्वातंत्र्यदिनी संध्याकाळी ६.३० च्या सुमारास ही घटना घडली.

  मुंबई : मुंबईतील भाजप महिला नगरसेविका अंजली खेडकर यांच्या संपर्क कार्यालयातच महिलेचा विनयभंग करुन बलात्काराचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बोरिवलीत वॉर्ड क्रमांक १६ राम मंदिर रोड वझीरा नाका येथे अंजली खेडकर यांचे कार्यालय आहे. देशाच्या स्वातंत्र्यदिनी संध्याकाळी ६.३० च्या सुमारास ही घटना घडली.

  तक्रार दाखल करुनही, पोलिसांनी महिनाभर दखल न घेतल्याचा महिलेचा आरोप आहे. तक्रार न करण्यासाठी भाजप नगरसेविकेने दबाव टाकल्याचा महिलेचा दावा आहे. बोरिवली पोलीस ठाण्यात बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या भाजप कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, आता या प्रकरणावरून राजकारण तापले असून महापौर किशोरी पेडणेकर यांनी थेट भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे.

  पीडित महिला बोरिवली येथेच रहायला असून तिला समाजसेवेची आवड आहे. जुलै २०२० मध्ये पीडित महिला आरोपी भाजपा कार्यकर्त्याच्या संपर्कात आली. अंजली खेडकर यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन त्यांनी भेट घेतली. तेव्हा आरोपीशी तिथे ओळख झाली. आपल्याला समाजसेवेची आवड असल्याचे पीडित महिलेने सांगितले. आरोपीशी ओळख झाल्यानंतर मोबाइल क्रमांकाची देवाण घेवाण झाली. महिलेचा वॉर्डच्या व्हॉट्स अॅप ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला. त्यातून त्यांना पक्षाच्या कार्यक्रमांची माहिती मिळत होती.

  आरोपीने सदर महिलेला संध्याकाळी ६.३० च्या सुमारास भेटण्यासाठी कार्यालयात बोलावले. त्याने कार्यालयाचे शटर बंद केले. लॉक करुन लाईट बंद केली. महिलेने आरोपीला शटर बंद करण्याचे कारण विचारले. त्यावेळी त्याने ऑफिस चालू आहे, हे कोणाला कळू नये, असे कारण दिले. त्यानंतर आरोपीने आपल्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, असे पीडित महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे.

  भाजपच्या स्टंटबाजी करणाऱ्या ताई कुठे गेल्या?

  बोरिवली येथील भाजपा नगरसेविका अंजली खेडकर यांच्या कार्यालयात एका महिलेला पद देतो सांगून छेडछाड करण्यात आली आहे. तसेच या महिलेला मारहाणही करण्यात आली आहे. यावर आता भाजपा गप्प का, भाजपच्या स्टंटबाजी करणाऱ्या ताई कुठे गेल्या? असा सवाल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे. इतर ठिकाणी महिलांबाबत काही घटना घडल्यास भाजपच्या महिला नेत्या, कार्यकर्त्या खोटं रडून दाखवता, महाराष्ट्राला बदनाम करतात. आता त्या कुठे आहेत? असा प्रश्न महापौरांनी उपस्थित केला आहे. भाजपाचे सरकार असलेल्या राज्यातही महिलांवर अत्याचार होतात. त्यावेळीही भाजपच्या महिला कार्यकर्त्या गप्प बसलेल्या असतात, असा टोला महापौरांनी लगावला आहे. केवळ महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम भाजपाकडून होत आहे. कोणत्याही पक्षाची महिला असो, अन्याय होत असेल तर भूमिका घेतली पाहिजे. मी असते तर थोबाड फोडून टाकले असते, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

  हेच भाजपाचे खरे चरित्र आहे – सचिन सावंत

  फडणवीस सरकारच्या काळातच महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार झाले होते. दुसरीकडे देशपातळीवर भाजपाची सत्ता असणाऱ्या राज्यांमध्ये महिलांवर अत्याचार होत आहेत. आत्ताची घटना त्यापेक्षाही गंभीर आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे त्या महिलेने खासदार गोपाळ शेट्टी व आमदार सुनील राणे यांना पत्र लिहून मदत मागितली. मात्र त्यांनी न्याय दिला नाहीच उलट तेथील भाजपा नगरसेविकांनी महिलेला मारहाण केली. हे यांचे खरे चरित्र आहे आणि महिला अत्याचारासंबंधी हीच यांची भूमिका आहे. त्यामुळे फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांनी याचे उत्तर दिले पाहिजे. भाजपाच्या कार्यालयातच महिला सुरक्षित नाहीत, असे सचिन सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

  पोलिसांनी कसून चौकशी करावी- चित्रा वाघ

  या प्रकरणात कोणीच आरोपींना पाठीशी घालत नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी कसून चौकशी करावी. या प्रकरणाशी संबंधित काही लोकांचे व्हिडिओ आमच्याकडे आले आहेत, ते आम्ही पोलिसांना देणार आहोत. ज्या भाजपा नगरसेविकेच्या कार्यालयात ही घटना घडली, त्या नगरसेविकेने पोलिसांना यासंदर्भात माहिती देणारे पत्र दिले आहे. तसेच पीडित महिला ही नगरसेविकाला या गुन्ह्यात खोटे अडकवण्याची धमकी देत असल्याचेही म्हटले आहे. पीडिता धमकी देत असली तरी आम्ही तिच्या बाजूने आहोत, पोलिसांनी प्रकरणाची सखोल चौकशी करावी. तसेच वर्ष उलटूनही बोरीवली पोलिसांनी तक्रार दाखल का करून घेतली नाही, असा सवालही चित्रा वाघ यांनी केला.

  महापौरांवर टीका

  महापौर पेडणेकर यांनी थोबाड फोडण्याच्या केलेल्या वक्तव्यावर चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली. विनोद घोसाळकर यांनी महिला नगरसेविकेचा विनयभंग केल्याच्या घटनेचा संदर्भ देत, तेव्हा तुम्हाला त्यांचे थोबाड फोडावे वाटले नाही का? असा सवाल केला. तसेच तुमच्याच पक्षाच्या माजी महापौरांनी भर रस्त्यात एका महिलेचा हात पिरगळला होता, तेव्हा तुम्हाला त्याचे थोबाड फोडावं वाटले नाही का? असेही चित्रा वाघ यांनी विचारले.