NCB LOGO

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरा अर्थात एनसीबीने गेल्या एका वर्षात मुंबईसह नवी मुंबई, ठाणे आणि इतर परिसरातून सुमारे १५० कोटींहून अधिक रक्कमेचे ड्रग्ज जप्त केले आहे. एनसीबी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी सांगितले की, गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून ते आतापर्यंत एनडीपीएस कायद्यांतर्गत ११४ गुन्हे दाखल करण्यात आले असून ३४ परदेशी आणि बॉलिवूड सेलिब्रिटींसह ३०० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे.

  मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरा अर्थात एनसीबीने गेल्या एका वर्षात मुंबईसह नवी मुंबई, ठाणे आणि इतर परिसरातून सुमारे १५० कोटींहून अधिक रक्कमेचे ड्रग्ज जप्त केले आहे. एनसीबी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी सांगितले की, गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून ते आतापर्यंत एनडीपीएस कायद्यांतर्गत ११४ गुन्हे दाखल करण्यात आले असून ३४ परदेशी आणि बॉलिवूड सेलिब्रिटींसह ३०० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे.

  समीर वानखेडे यांनी सांगितले की, वर्षभरात शहर आणि एमएमआर क्षेत्रातून १०० किलो कोडीन ड्रग्ज, ३० किलो चरस, १२ किलो हिरोईन, दोन किलो कोकीन, ३५० किलो गांजा, ६० किलो इफेड्रिन आणि २५ किलो एमडी जप्त करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत ड्रग्जचा गोरखधंदा वाढला आहे. त्यानुसार सापळा रचून कारवाई सुरू आहे. तसेच धाडसत्र कायम आहे. आतापर्यंत विविध प्रकारच्या अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांना अटक करण्यासाठी सुमारे १२ कोटींच्या आसपास मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई यापुढेही अशीच जारी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांमध्ये राेख रक्कम, ड्रग्ज आणि काही दागिन्यांचाही समावेश आहे.

  एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ड्रग्ज तस्कर आपल्या नातेवाईक आणि मित्रांच्या नावावर मालमत्ता खरेदी करतात, असे कित्येकदा आढळून आले आहे. जर अशावेळी ड्रग्ज तस्करांसोबत त्यांचा संबंध प्रस्थापित होत असेल तर अशा मालमत्ताही जप्त करण्यात येतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

  मुंबई पोलिसांच्या अॅन्टी नार्कोटिक्स सेलने (एएनसी) ‘कोडेन फॉस्फेड’ या अंमली पदार्थयुक्त कफ सिरफ याची मोठी खेप पकडण्यात आली आहे. याप्रकरणी मुकेश चौधरी या आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून २३ लाख ७० हजार रुपयांच्या ७९०० बॉटल्स कफ सिरफ जप्त करण्यात आले आहे. कफ सिरफ बहुतांशी लहान मुले व्यसनासाठी उपयोग करत असल्याचे समजते.

  मुंबई पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले की, एएनसीच्या घाटकोपर युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक लता सुतार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक फरीद खान, उप निरीक्षक सचिन पालवे यांच्या पथकाने मानखुर्द येथील जाकिर हुसैन नगर स्थित घाटकोपरकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोड येथून एका संशयिताला ताब्यात घेतले.

  मुंबई पोलिसांनी अंमलीपदार्थ जप्त करून मानखुर्दमधून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने पालघर जिल्ह्यातील विरार येथे कोडेन फॉस्फेट कफ सिरफच्या बाटल्या ठेवल्याचे कबूल केले. त्यानुसार पोलिसांनी विरारमधील गोदामावर छापा टाकला.

  केवळ ड्रग्जची विक्री करणारा गुन्हेगार असतो, अशी अनेकांची मान्यता आहे, पण ड्रग्जचे सेवन करणाराही गुन्हेगार आहे. ड्रग्जचे सेवन करणे योग्य नाही. जे अशा अंमलीपदार्थांचे सेवन करत आहेत, ते देखील याला जबाबदार आहेत. त्यांच्यावरही एनडीपीसी अधिनियमांतर्गत कारवाई होईल.

  -समीर वानखेडे, संचालक, एनसीबी, मुंबई विभाग