मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानावर खासदार संजय राऊत यांचा पडदा टाकण्याता प्रयत्न

“सरकार ५ वर्ष चालवायची कमिटमेंट आहे. शिवसेना शब्दांची पक्की असते. शिवसेना कधी विश्वासघात करत नाही, शिवसेना पाठीत खंजीर खुपसत नाही. शिवसेना दिलेला शब्द मोडत नाही. ही शिवसेनेची खासियत आहे. आम्ही सगळे त्याच मार्गाने चालतो. हे सरकार पडेल, या भ्रमात कुणी राहू नये.” असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

    मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मराठवाड्यातील ‘आजी, माजी, भावी सहकारी’ वाल्या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात विवीध चर्चांना सुरुवात झाली. काल शुक्रवारचा पुर्ण दिवस मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचा माध्यमांनी किस काढला. पण आता शिवसेना नेते व राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याता प्रयत्न केला आहे.

    या प्रकरणावर मुंबईतील माध्यम प्रतिनिधींशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, “मुख्यमंत्री ठाकरे यांची एक भाषण करण्याची स्टाईल आहे. त्या पद्धतीने त्यांनी हे भाषण केलं. त्यांनी असं कुठेही म्हटलेलं नाही की नवीन आघाडी होईल, आम्ही या सरकारमधून बाहेर पडू. त्यांनी स्पष्ट सांगितलंय की ज्यांना भावी सहकारी व्हायचंय, ते आमच्याकडे येऊ इच्छित आहेत. त्यांनी यावं आणि ते भावी सहकारी असा त्याचा अर्थ होतो.”

    “सरकार ५ वर्ष चालवायची कमिटमेंट आहे. शिवसेना शब्दांची पक्की असते. शिवसेना कधी विश्वासघात करत नाही, शिवसेना पाठीत खंजीर खुपसत नाही. शिवसेना दिलेला शब्द मोडत नाही. ही शिवसेनेची खासियत आहे. आम्ही सगळे त्याच मार्गाने चालतो. हे सरकार पडेल, या भ्रमात कुणी राहू नये.” असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

    राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात बोलताना केलेल्या विधानावरून तर्क-वितर्क सुरू झाले. व्यासपीठावर बसलेले रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्याकडे बघून त्यांनी “आजी, माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी”, असा उल्लेख केल्यानंतर शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.