‘राज्यपाल महोदय इतका अभ्यास बरा नव्हे’ संजय राऊतांचा टोला

    राज्य सरकारने मंत्रिमंडळात घेतलेला निर्णय राज्यपालांवर बंधनकारक असतो परंतु राज्यपाल भगसिंह कोश्यारी अभ्यास करण्यात व्यस्त आहेत. असा घणाघात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राज्य सरकारने विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या कार्यक्रमाची फाईल राज्यपालांना दिली आहे. राज्यपालांनी यावर अद्याप निर्णय दिला नाही. तसेच राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा प्रश्न गेल्या वर्षभरापासून प्रलंबित आहे. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.

    राऊत म्हणाले की, राज्यपाल आपले फार अभ्यासू आहेत. त्यांना प्रत्येक विषयाचा अभ्यास करावा लागतोय. इतका अभ्यास बरा नाही. त्या अभ्यासाचं ओझं झेपलं पाहिजे. इथे मुळात लॉकडाऊन काळात अभ्यास कमी झाला आहे. आता प्रत्येक गोष्टीत अभ्यास करायला लागलात. आपल्या संविधानात काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. त्यानुसार काम करायचं आहे. घटनेत स्पष्ट लिहिलंय की मंत्रिमंडळाच्या शिफारशी तुम्ही मान्य करायच्या आहेत, असं राऊत म्हणाले.

    शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना राज्यपालांवर टीका केली. त्यांनी ‘महाराष्ट्राचे राज्यपाल हे फारच अभ्यासू व्यक्ती आहेत. इतका अभ्यास बरा नव्हे घनेत स्पष्ट लिहिले आहे की राज्य सरकारने राज्यपालांना केलेल्या शिफारसी त्यांनी मान्य करायच्या असतात. आमच्या १२ आमदारांची नियुक्ती करणे त्यांना बंधनकारक आहे. लोकशाहीत इतका अभ्यास बरा नाही. तुम्हाला त्वरित निर्णय घ्यायचा असतो.’ असे म्हणत राज्याचे राज्यपालांकडे असलेल्या महत्वाचे प्रलंबित निर्णय त्यांनी त्वरित घ्यावे अशी मागणी केली.

    शांतता अभ्यास सुरू आहे असं नवीन नाट्य राजभवनात सुरू आहे. आणि त्याचे पात्र जे आहे ते केवळ राज्यपालच नाहीत तर भाजपचे नेतेही त्या नाट्यात भाग घेत आहेत. आता काही दिवस नाटक चालेल. नाटक रंगू द्या. कारण आता ५० टक्के क्षमतेची आसन व्यवस्था असल्याने अशा प्रकारची नाटकं होतं असतात, असा टोलाही त्यांनी लगावला.