shekhar channe

एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने (Shekhar Channe) यांनी बडतर्फ कर्मचाऱ्यांना (MSRTC Workers Strike) पुन्हा कामावर घेता येत नाही, असं नमूद करत संपावर ठाम (MSRTC Workers Fired)असणाऱ्या कामगारांना इशारा दिला आहे.

    मुंबई : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप (MSRTC Strike) अजूनही पूर्णपणे मिटलेला नाही. काही कर्मचारी कामावर रूजू झाले असले तरी बहुतांश कर्मचारी अद्यापही आंदोलनावर ठाम आहे. त्यामुळेच एसटी महामंडळाने अनेक कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्ती, बडतर्फ करण्याची कारवाई (Action On MSRTC Workers) करण्यात आली आहे. एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने (Shekhar Channe) यांनी सगळी आकडेवारी माध्यमांसमोर ठेवली. तसेच बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेता येत नाही, असं नमूद करत संपावर ठाम असणाऱ्या कामगारांना इशारा दिला आहे.

    शेखर चन्ने म्हणाले, “संप सुरू झाला तेव्हा पटावर ९२ हजार कर्मचारी होते. त्यानंतर रोजंदारीवर असलेल्या २००० लोकांची सेवासमाप्ती झाली. कालपर्यंत (१३ जानेवारी) ३१०० कर्मचारी सेवेतून बडतर्फ झालेत. साधारणतः या काळात संप केल्याने आणि इतर काही कारणाने आम्हाला ५००० कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त कराव्या लागल्या. साधारणतः ८७ ते ८८ हजार कर्मचारी आत्ता पटावर आहेत. यापैकी २६ हजार ५०० कर्मचारी आत्ता कामावर आहेत.”

    पत्रकारांनी संपादरम्यान बडतर्फ कर्मचाऱ्यांच्या परत येण्याचा काही मार्ग आहे का असा प्रश्न विचारला. यावर शेखर चन्ने यांनी बडतर्फ कामगारांना पुन्हा सेवेत घेता येत नाही, असं म्हणत गंभीर इशारा दिला आहे.

    “बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर येण्यासाठी काही प्रक्रिया आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी देखील आधी सांगितलं होतं की बडतर्फ झाल्यावर त्याला कामावर घेता येत नाही. ती तेवढी सोपी प्रक्रिया नाही. त्यामुळेच कर्मचाऱ्यांना आमचं आवाहन आहे की अशाप्रकारची कारवाई त्यांच्यावर करण्याची वेळ येऊ नये. त्यांना यातून पुढे त्रास होऊ नये म्हणून त्यांनी रूजू व्हावं. अनेक कर्मचाऱ्यांची कामावर हजर होण्याची इच्छा आहे. ते रुजू होत आहेत. सध्या महाराष्ट्रात सकारात्मक चित्र दिसून येत आहे,” असं शेखर चन्ने यांनी नमूद केलं.

    “एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले, तर त्यांच्यावर कारवाई करणार नाही. ७५० खासगी चालक कंत्राटी पद्धतीने घेण्यात येत आहेत. जे सेवानिवृत्त झाले आहेत, ज्यांचे वय ६२ पेक्षा कमी आहे, जे फिट आहेत त्यांना काही काळ कामासाठी घेणार आहोत. एसटी सेवा प्रवाशांना मिळावी हा खासगी चालक कंत्राटी पद्धतीने घेण्यामागचा हेतू आहे,” असंही चन्ने यांनी सांगितलं.