Mumbai Bhendi Bazaar

मुंबईच्या मध्यवर्ती असलेल्या भेंडी बाजार येथे अनेक जुन्या इमारती असून त्यांचा सैफी बुरहाणी अप्लिमेंट ट्रस्ट (एसबीयुटी) द्वारे पुनर्विकास हाेणार आहे. या भागाचा समुह पुनर्विकास (क्लस्टर डेव्हलपमेंट) हाेणार आहे. मात्र पुनर्वसनाच्या जागेत महापालिकेचे २४ भूखंड अडचणीचे ठरत होते. मात्र पालिकेने बुरहाणी ट्रस्टसोबत भूखंडांची अदलाबदल केल्याने ५ वर्ष रखडलेला भेंडी बाजारच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे(Mumbai Bhendi Bazaar redevelopment cleared, BMC approves cluster development).

    मुंबई : मुंबईच्या मध्यवर्ती असलेल्या भेंडी बाजार येथे अनेक जुन्या इमारती असून त्यांचा सैफी बुरहाणी अप्लिमेंट ट्रस्ट (एसबीयुटी) द्वारे पुनर्विकास हाेणार आहे. या भागाचा समुह पुनर्विकास (क्लस्टर डेव्हलपमेंट) हाेणार आहे. मात्र पुनर्वसनाच्या जागेत महापालिकेचे २४ भूखंड अडचणीचे ठरत होते. मात्र पालिकेने बुरहाणी ट्रस्टसोबत भूखंडांची अदलाबदल केल्याने ५ वर्ष रखडलेला भेंडी बाजारच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे(Mumbai Bhendi Bazaar redevelopment cleared, BMC approves cluster development).

    हा प्रायाेगिक तत्वावरील प्रयाेग यशस्वी झाल्यास मुंबईत इतर ठिकाणीही अशा प्रकारे क्लस्टर डेव्हलपमेंट करता येऊ शकते अशी माहिती पालिकेच्या सुधार समितीचे अध्यक्ष सदानंद परब यांनी दिली.

    भेंडी बाजार येथे जुन्या इमारती मोठया संख्येने आहेत. जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी सैफी बुरहाणी अप्लिमेंट ट्रस्ट (एसबीयुटी) द्वारे गेले कित्तेक वर्ष प्रयत्न सुरु होते. मात्र या पुनर्विकासाच्या जागेमध्ये पालिकेचे २४ भूखंड अडचणीचे ठरत होते. क्लस्टर डेव्हलपमेंट करण्यासाठी या भूखंडांच्या अदलाबदलीचा प्रस्ताव पालिकेकडे देण्यात आला होता. या प्रस्तावाला पालिकेच्या सुधार समितीने मंजुरी दिली आहे. यामुळे पालिकेला भाडे आणि प्रीमियम मिळणार आहे. पालिकेच्या ताब्यात येणाऱ्या भूखंडावरील रहिवाश्याचे पुनर्वसन करणे पालिकेला सोपे जाणार आहे असे परब यांनी सांगितले.

    भेंडी बाजार येथील पुनर्विकासाच्या जागेत पालिकेच्या मालकीचे २४ भूखंड होते. पालिकेने हे २४ भूखंड सैफी बुरहाणी अप्लिमेंट ट्रस्टला दिले आहेत. त्याबदल्यात ट्रस्टने पालिकेला भुलेश्वर येथे ४४७.७० चौरस मीटर तर मांडवी येथे ४०९७ चौरस मीटर असे दोन भूखंड दिले आहेत. तसेच या भूखंडांच्या अदलाबदलीमधील फरक म्हणून ट्रस्टने पालिकेला २१ कोटी रुपयेही दिले आहेत. यामुळे आता भेंडी बाजारमधील पुनर्विकासातील अडचणी दूर झाल्या आहेत.

    ट्रस्टच्या ताब्यात दिलेल्या पालिकेच्या जागेवरील रहिवाशांचा पुनर्विकास ट्रस्ट करणार आहे. तर पालिकेच्या ताब्यात आलेल्या भूखंडावरील पुनर्विकास पालिकेला करता येणार आहे. त्यामधून पालिकेला भाडे आणि प्रीमियम मिळणार आहे. असेच भूखंड अदलाबदली करून मुंबईमध्ये पुनर्विकास करणे यामुळे शक्य होणार असल्याचे परब यांनी सांगितले.