Mumbai Legislative Council Election: Rebel Congress Candidate Withdraws Candidate Election Unopposed; BJP-Sena candidate wins

  मुंबई : कॉंग्रेसचे बंडखोर उमेदवार सुरेश कोपरकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने विधान परिषदेच्या मुंबई स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा निकाल स्पष्ट झाला आहे. कोपरकर यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांना काँग्रेसचा पाठिंबा होता. मात्र, त्यांची उमेदवारी मागे घेतल्याने भाजप उमेदवार राजहंस सिंह आणि शिवसेनेचे उमेदवार सुनील शिंदे यांचा मार्ग मोकळा झाल्याचे स्पष्ट झाले आहे(Mumbai Legislative Council Election: Rebel Congress Candidate Withdraws Candidate Election Unopposed; BJP-Sena candidate wins).

  तिरंगी लढतीचा धोका टळला

  दरम्यान काँग्रेसच्या सुरेश कोपरकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने विधान परिषदेची निवडणूक तिरंगी होणार होती. कोपरकर यांच्या उमेदवारीमुळे सुनील शिंदे यांना मराठी मतांचा दगाफटका होणार का? की राजहंस सिंग यांना होणार अश्या चर्चा मुंबईत रंगल्या होत्या. त्यामुळे भाजपनेते देवेंद्र फडणवीस यानी कालच सागर बंगला येथे बैठक घेवून आढावा घेतला होता.

  शिवसेनेला पालिका निवडणुकीत बळ

  शिवसेनेचे उमेदवार वरळीचे माजी आमदार सुनील शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यासाठी २०१९मध्ये विधानसभा निवडणुकीत त्याग केला होता. सुनील शिंदे हे शिवसेनेचे माजी आमदार आहेत. ते मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवकही आहेत. शिवाय बेस्ट समितीचे ते अध्यक्षही होते. पुढील वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांना उमेदवारी देण्यात आल्याने शिवसेनेला पालिका निवडणुकीत बळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  उत्तर भारतीय राजकारण यशस्वी

  भाजपने माजी आमदार राजहंस सिंह यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे. राजहंस सिंह हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते. ते नगरसेवक ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. भाजपमध्ये आल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर ते अडगळीत गेले होते. मात्र, भाजपने आता त्यांना उमेदवारी देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. पुढील वर्षी महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर उत्तर भारतीय व्होटबँक आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपने राजहंस सिंह यांना उमेदवारी दिल्याचे सांगितले जात आहे.