धुळे- नंदुरबार विधान परिषद: भाजपचे अमरिश पटेल यांची बिनविरोध निवड, गौरव वाणी यांचा उमेदवारी अर्ज मागे

आज दुपारी महाविकास आघाडीचे उमेदवार गौरव वाणी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. या बरोबरच अन्य चौघांनी देखील उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे या जागेवर आमदार अमरिश पटेल यांची बिनविरोध निवड झाली.

    मुंबई : राज्याच सध्या विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विधानपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत होती, त्यामुळे सकाळपासूनच जोरदार राजकीय घडामोडी घडताना दिसत होत्या. अखेर तीन वाजपेर्यंत राजकीय तडजोडींमधून राज्यातील सहा पैकी चार जागा बिनविरोध करण्यावर शिक्कामोर्तब झाला, त्यानुसार विरोधी अर्ज मागेही घेतल्या गेले.

    राज्यात आता दोन जागांचा तिढा न सुटल्याने या ठिकणी निवडणूक होत चुरशीचा सामना पाहयाल मिळणार आहे. धुळे- नंदुरबार विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून आमदार अमरिश पटेल यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली होती. तर महाविकास आघाडीने तळोदाचे नगरसेवक गौरव वाणी यांना उमेदवारी दिली होती. या बरोबरच काँग्रेसकडून शामकांत सनेर तसेच शिरपूरचे उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल आणि नगरसेवक प्रभाकरराव चव्हाण यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेससह भाजपकडून ही निवडणूक बिनविरोध करण्यात येईल असे संकेत देण्यात येत होते.

    काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील निवडणूक बिनविरोध होण्यासाठी चर्चा सुरू असल्याचे सांगून या बिनविरोध प्रक्रियेला दुजोरा दिला. त्यानुसार आज दुपारी महाविकास आघाडीचे उमेदवार गौरव वाणी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. या बरोबरच अन्य चौघांनी देखील उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे या जागेवर आमदार अमरिश पटेल यांची बिनविरोध निवड झाली. दरम्यान या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना उमेदवार गौरव वाणी यांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे आपण उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे सांगितले. कोणतीही निवडणूक बिनविरोध केल्यामुळे वेळ आणि पैशाचा अपव्यय होणे टळते. हा चांगला पायंडा असल्याचे मत त्यांनी मांडले. त्यामुळं भाजपाचे अमरिश पटेल यांचा मार्ग मोकळा झाला असुन, ते येथे बिनविरोध निवडणून येणार आहेत.