२० वर्षे सोबत होतात तेव्हा डोक्याला गंज चढला होता का ? भाजपच्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर महापौर किशोरी पेडणेकरांचा सवाल

२५ वर्षे भ्रष्टाचार (Corruption) झाला असा आरोप करणारे विरोधक गेले २० वर्षे आमच्या मांडीवर बसले होते. तेव्हा डोक्याला गंज आला होता का ? असा टोला महापौर किशोरी पेडणेकरांनी (Mumbai Mayor Kishori Pednekar) भाजपाला (Kishori Pednekar Reply To BJP) लगावला आहे.

  मुंबई : मुंबईमध्ये होम टेस्ट किटची विक्री (Home Test Kit) जोरात सुरू आहे. मात्र यापुढे आधारकार्ड क्रमांक दिल्याशिवाय हे किट मिळणार आहे. जर कोणी याचा धंदा केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांनी दिला आहे. तसेच २५ वर्षे भ्रष्टाचार (Corruption) झाला असा आरोप करणारे विरोधक गेले २० वर्षे आमच्या मांडीवर बसले होते. तेव्हा त्यांच्या डोक्याला गंज आला होता का ? असा टोला महापौरांनी भाजपाला  (Kishori Pednekar Reply To BJP) लगावला आहे.

  महापौर किशोरी पेडणेकर पुढे म्हणाल्या की, होम किट टेस्ट किट मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत. त्यासाठी पालिकेने नियमावली केली आहे. किट बनवणाऱ्या कंपन्या, डिस्ट्रीब्युटर आणि केमिस्ट यांना आता किट कोणाला विकले गेले याची नोंद ठेवावी लागणार आहे. आधारकार्ड नंबर दिल्याशिवाय किट मिळणार नाही. मात्र जर कोणी याचा धंदा करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा महापौरांनी दिला.

  मुंबईत आतापर्यंत १,०६,९८७ लोकांनी चाचण्या केल्या आहेत. त्यापैकी ३५४९ पॉझिटीव्ह आले आहेत. नागरिकांनी आरटीपीसीआर करण्यापेक्षा होम टेस्ट किटचा वापर करावा. मात्र त्याचा रिपोर्ट अपलोड करावा असे आवाहन महापौरांनी केले. कोरोनाच्या प्रसाराला घाबरू नका, मात्र काळजी घ्या असे आवाहनही महापौरांनी केले.

  गेल्या २५ वर्षात पालिका आणि शिवसेनेने दीड लाख कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. यावर बोलताना विरोधकांकडून नेहमीच आरोप केले जात आहेत. प्रत्येकाने एक विरोधाचा अजेंडा घेतला आहे. नुसते बोलू नये तर ते भ्रष्टाचार सिद्ध करून दाखवावेत असे आवाहन महापौरांनी भाजपाला केले आहे. आयुक्त आणि आम्ही चांगले काम करत आहोत हीच विरोधकांची पोटदुखी आहे. नागरिक सुरक्षित राहावे म्हणून आम्ही काम करत आहोत.

  २० वर्षांचा हिशोब द्या
  भाजपा गेल्या २५ वर्षांत दीड लाख कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचे म्हणत आहे. त्यातील २० वर्षे ते आमच्या मांडीवर बसले होते. तेव्हा यांच्या डोक्याला गंज चढला होता का असा प्रश्न उपस्थित करत आधी तुम्ही २० वर्षाचा हिशोब द्या मग आम्ही ५ वर्षाचा देतो, असा टोला महापौरांनी भाजपाला लगावला आहे.

  गरोदर महिला सुरक्षित
  कोरोना दरम्यान गरोदर असलेल्या महिला कोरोना पॉझिटीव्ह येत आहेत. याबाबत बोलताना, गरोदर महिला पॉझिटीव्ह येत आहेत. नायरमध्ये ३०० गरोदर महिला दाखल आहेत. त्यापैकी १७० गरोदर महिला पॉझिटिव्ह आहेत. आई बाळ सुरक्षित असल्याची माहिती महापौरांनी दिली.

  घाटकोपर घटनेची चौकशी
  घाटकोपर येथे लस घेतल्यावर एका १५ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला असे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आहे. याबाबत बोलताना, आरोग्य विभागाला चौकशी करण्यास सांगितले आहे. राजावाडी रुग्णालयात ८ जानेवारीला त्या मुलीला लस देण्यात आली.११ जानेवारीला तिचा मृत्यू झाला. अचानक हार्ट अटॅक आला असे समजले. या प्रकरणी कोणी मृत्यूचे सर्टिफिकेट दिले. पोस्ट मार्टम का नाही झाला याची चौकशी करण्यास सांगितले आहे. पालिका लसीकरणानंतर माहिती घेते. तीच्या पालकांनीही लसीकरणामुळे मृत्यू झाला असे म्हटलेले नाही. घरी जाऊन त्या कुटुंबाची भेट घेणार असल्याचे महापौरांनी सांगितले.