मुंबई पालिका प्रशासन बायोमेट्रिक हजेरीवर ठाम, म्युनिसिपल कामगार सेनेकडून काळ्या फिती लावून निषेध

कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) धडकली आहे. पालिका कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रिक हजेरी बंद (BMC Employees Demand To Stop Biometric Attendence System) करण्याची मागणी केली आहे. परंतु पालिका प्रशासन (BMC) बायोमेट्रिक हजेरी पद्धतीवर ठाम आहे.

    मुंबई : महानगरपालिका कर्मचारी, अधिकारी यांच्या सेवेवर प्रशासन अविश्वास दर्शवित आहे. हे आता स्पष्ट झाले आहे. कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) धडकली आहे. पालिका कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रिक हजेरी बंद (BMC Employees Demand To Stop Biometric Attendence System) करण्याची मागणी केली आहे. परंतु पालिका प्रशासन (BMC) बायोमेट्रिक हजेरी पद्धतीवर ठाम आहे. याचा निषेध म्हणून कामगारांनी काळ्या फिती लावून काम करावे असे आवाहन म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष व कामगार नेते बाबा कदम यांनी सांगितले.

    महापालिका प्रशासनाने बायोमेट्रिक हजेरी सुरु करण्याचे परिपत्रक १ जानेवारीपासून प्रसारित केलेले आहे. त्यासंदर्भात म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना अध्यक्ष बाबा कदम यांच्या नेतृत्वाखाली समन्वय समितीचे सर्व कामगार नेते आयुक्तांना वारंवार विनंतीपत्र व संबंधित अतिरिक्त आयुक्त यांच्यासोबत प्रत्यक्ष भेट घेऊन बायोमेट्रिक हजेरी कोरोना काळामध्ये बंद करावी अशी आग्रही मागणी करत आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर व स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनीही प्रशासनाला युनियनच्या मागणीचा विचार करावा असे सुचित केले आहे.

    या आधीच महानगरपालिकेने २५९ कामगार, कर्मचारी, अधिकारी यांना या कोरोना महामारीच्या कालावधीत सेवा करत असताना गमावले आहे. याची दखल घेऊन कामगारांच्या जीवाशी खेळ करु नये,अशीही आयुक्तांना विनंती केली आहे. एवढेच नव्हे तर राज्य शासनाने सुध्दा बायोमेट्रिक उपस्थितीबाबत ३१ जानेवारीपर्यंत स्थगिती दिलेली आहे, असे असून देखील शासकीय आदेशावर तसेच महापालिका कामगार, कर्मचारी यांच्या उपस्थितीवर अविश्वास दाखविण्यात येत आहे.

    प्रशासनाच्या या आडमुठ्या व कामगारविरोधी धोरणामुळे बायोमेट्रिक हजेरी बंद होऊ शकणार नाही. कामगारांना सक्तीने बायोमेट्रिक हजेरी करावीच लागेल, असे ठाम मत प्रशासनाचे आहे. बायोमेट्रिक हजेरी संदर्भात समन्वय समिती न्यायालयीन लढा लढत असून या विरोधात न्यायालयात बाजू मांडून बायोमेट्रिक हजेरीवर स्थगिती मिळविण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र कामगारद्रोही प्रशासनाचा जाहिर निषेध काळया फिती लावून कामगारांनी करावा असे आवाहन म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना व समन्वय समितीने कामगारांना केले आहे.