TRP घोटाळ्याबाबत मुंबई पोलिसांचा मोठा खुलासा; रिपब्लिक टीव्हीवरील कारवाईनंतर बाहेर आला फसवणूकीचा खेळ

मुंबई : टीआरपी घोटाळ्याबाबत मुंबई पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. मुंबई पोलीस अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रसार माध्यमांना याबाबत माहिती दिली.

पोलिस तपासानुसार टीआरपीमधील फसवणूकीचा खेळ हा चक्क २०१६ साला पासून सुरू होता. २०१६ ते २०१९ या काळात घरांमधून येणाऱ्या डेटाची सर्वाधिक छेडछाड केली गेली. यासंदर्भात मुंबई पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे.

मुंबई पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या म्माहितीनुसार प्राथमिक पुराव्यांच्या आधारे आरोपपत्र दाखल केले आहे. २०१६ ते २०१९ च्या दरम्यान टीआरपी डेटामध्ये सर्वाधिक बदल तेलगू आणि इंग्रजी भाषेच्या वाहिन्यांच्या प्रवेशासंदर्भात करण्यात आले.

ठोस पुरावे मिळाल्यानंतर या प्रकरणातील आरोपींना अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. कारण एखाद्या विशिष्ट वाहिनीची अधिक टीआरपी दर्शविण्यासाठी डेटामध्ये सतत छेडछाड केली जात असल्याचे समोर आले आहे. यावर्षी ६ ऑक्टोबर रोजी टीआरपीमध्ये घोटाळ्याचा गुन्हा दाखल केल्याची माहितीही पोलिसांनी दिली. रिपब्लिक टीव्ही टीआरपीमध्ये अव्वल क्रमांकाचा बनला होता हे तपासणी दरम्यान त्यांना समजले.