दहशतवादी लोकल ट्रेनमध्ये विषारी गॅस हल्ला करण्याची शक्यता, पोलिस यंत्रणा अलर्ट

काही दिवसांपुर्वीच दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने 6 संशयित दहशतवाद्यांना अटक केली. यातील एक आरोपी मुंबईतील धारावी परिसरातील रहिवासी आहे. दिल्ली स्पेशल सेलच्या सूत्रांनी सांगितले की, अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांचे मुंबईच्या लोकल ट्रेनसह देशातील विविध भागात दहशतवादी कारवाया करण्याचे नियोजन होते.

    मुंबई : दहशतवादी मुंबईतील लोकल ट्रेनवर गॅस हल्ला करणार असल्याची माहिती GRP पोलिसांना गुप्तचर संघटनांकडून देण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने काही दहशतवाद्यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करताना पोलिसांना या हल्ल्याची माहिती मिळाली व त्यांनी रेल्वे प्रशासनाला अलर्ट केलं.

    चार दिवसांपूर्वी सहा दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. या दहशतवाद्यांची चौकशी करताना त्यांच्या निशाण्यावर मुंबई लोकल असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे आता मुंबई लोकल स्थानकांवरच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. काही महत्वाच्या रेल्वे स्थानकावरील एन्ट्री आणि एक्झिटच्या मुख्य मार्गाव्यतिरिक्त इतर सर्व रस्ते बंद केले आहेत.

    दहशतवाद्यांनी मुंबई लोकलची रेकी केली होती. दहशतवाद्यांचा मुंबई लोकलची रेकी करण्यामागे नक्की काय हेतू होता? याबाबत तपासयंत्रणा आणखी तपास करत आहेत. स्पेशल सेलला माहिती मिळाली होती की पाकिस्तान समर्थित दहशतवादी गट दिल्ली आणि जवळपासच्या भागात स्फोट घडवण्याचा कट आखत आहेत आणि त्यांचं लक्ष्य गर्दीची ठिकाणं आहेत.

    एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आम्हाला वेळोवेळी असे अलर्ट मिळतात असतात. लोकल ट्रेन संदर्भातील प्रत्येक अलर्ट आम्ही अत्यंत गांभीर्याने घेतो आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पावलेही उचलतो. दिल्ली पोलिसांच्या कारवाईनंतर जीआरपीने मुंबईतील सर्व प्रमुख रेल्वे स्थानकांची सुरक्षा वाढवली आहे.

    दरम्यान, या अर्लट नंतर जीआरपीने आता थेट मॉकड्रिल करणे सुरू केले आहे. ज्यामध्ये अधिकाऱ्याला दहशतवादी हल्ल्यादरम्यान प्रवाशांना कसे वाचवायचे आणि कसे पकडायचे ते शिकायला मिळते. जीआरपीने प्रमुख रेल्वे स्थानकावर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. तर जीआरपीचे अधिकारी राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांसह इतर एजन्सींच्या संपर्कात आहेत.