Municipal launches first automated car park based on robotic technology; 240 vehicles can be parked

यानंतर तब्बल २१ मजली वाहनतळामध्ये असणा-या भव्य लिफ्टमध्ये ती कार स्वयंचलित पद्धतीने सरकवली जाते. त्यानंतर २१ मजल्यांपैकी ज्या मजल्यावर कार उभी करण्यासाठी जागा उपलब्ध आहे, त्या मजल्यावरील पार्किंगच्या ठिकाणी लिफ्ट स्वयंचलित पद्धतीनेच जाऊन ‘कार’ पार्क केली जाते. पार्किंगमधून कार बाहेर काढताना रोबोटिक व स्वयंचलित पद्धतीनेच ‘कार’ बाहेर पडते. असे या पालिकेच्या पहिल्या स्वयंचलित वाहनतळाचे वैशिष्ट्ये आहे.

  मुंबई : पालिकेच्या डी विभागील भुलाभाई देसाई मार्गालगत असलेल्या हबटाऊन स्कायबे या इमारतीमध्ये रोबोटिक तंत्रज्ञानावर आधारित स्वयंचलित वाहनतळ आजपासून मुंबईकरांच्या सेवेत रुजू झाले आहे. तब्बल २१ मजली वाहनतळ असून यात २४० वाहने उभी करता येणार आहेत.

  मुंबई महापालिकेच्या या पहिल्या स्वयंचलित वाहनतळाचे लोकार्पण पर्यावरण मंत्री व मुंबई उपनगराचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुंबई शहराचे पालक मंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर आदी उपस्थित होते.

  मुंबईतील डी वॉर्डमधील भुलाभाई देसाई मार्गालगत हे बहुमजली रोबोटिक तंत्रज्ञानावर आधारित असलेले हे स्वयंचलित वाहनतळ गुरुवारपासून मुंबईकरांच्या सेवेत आले आहे. वाहनतळाच्या प्रवेशद्वारावर असणा-या एका भव्य पोलादी ‘प्लेट’ वर कार उभी केली जाते. कारची नोंद पार्किंगच्या प्रवेशद्वाराजवळ असणा-या रिसेप्शन काऊंटरवर संगणकीय पद्धतीने केली जाते. त्यानंतर ज्या पोलादी प्लेटवर कार उभी असते, ती प्लेट स्वयंचलित पद्धतीने कारसह वाहनतळामध्ये प्रवेश करते.

  यानंतर तब्बल २१ मजली वाहनतळामध्ये असणा-या भव्य लिफ्टमध्ये ती कार स्वयंचलित पद्धतीने सरकवली जाते. त्यानंतर २१ मजल्यांपैकी ज्या मजल्यावर कार उभी करण्यासाठी जागा उपलब्ध आहे, त्या मजल्यावरील पार्किंगच्या ठिकाणी लिफ्ट स्वयंचलित पद्धतीनेच जाऊन ‘कार’ पार्क केली जाते. पार्किंगमधून कार बाहेर काढताना रोबोटिक व स्वयंचलित पद्धतीनेच ‘कार’ बाहेर पडते. असे या पालिकेच्या पहिल्या स्वयंचलित वाहनतळाचे वैशिष्ट्ये आहे.

  असे आहे वाहनतळ

  २१ मजली वाहनतळामध्ये साधारणपणे २४० वाहने उभी करता येतील, एवढी जागा उपलब्ध आहे. या वाहनतळाला २ प्रवेशद्वारे असून २ बहिर्गमन द्वारे आहेत. या वाहनतळाची स्वयंचलित प्रचालन क्षमता ही दर तासाला ६० वाहनांचे प्रचालन करण्याइतकी आहे. हे वाहनतळ आठवड्याचे सातही दिवस व २४ तास कार्यरत राहणार आहे. वाहनतळ उभारण्यासाठी वापरण्यात आलेल्या सामुग्रीपैकी ८० टक्के सामुग्री भारतीय असून २० टक्के सामुग्री ही आयात केलेली आहे. या वाहनतळामध्ये स्वयंचलित पद्धतीने वाहनांची ने- आण करण्याकरीता २ मोठे उद्वाहक असून या व्यतिरिक्त २ शटल डिव्हाइस व २ सिलोमेट डॉली आहेत. तसेच कार वळविण्यासाठी ४ स्वयंचलित टर्न टेबल देखील या वाहनतळामध्ये आहेत.