‘पप्पा बुलेटप्रुफ जॅकेट घालून निघाले होते, कुठे गेले ते जॅकेट?’, शहीद हेमंत करकरे यांची मुलगी जुई करकरे यांचा सवाल

मुंबई हल्ल्यावेळी दहशतवाद्यांकडे आधुनिक शस्त्रास्त्रे होती. तर पोलिसांकडे जुन्ही हत्यारे होती. मात्र ती घेऊन ते सगळे लढले. हे सगळं बदलण्याची गरज आहे. हे सगळं बदललं असेल अशी आशा आहे.

  मुंबई : २६-११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात (26/11 Terrorists Attack) तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे (ATS Chief Hemant Karkare) शहीद (Martyr) झाले होते. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला होता. आता या घटनेच्या १३ वर्षांनंतर त्य़ांची मुलगी जुई करकरे यांनी या बुलेटप्रूफ जॅकेटवर प्रश्न उपस्थित केला आहे. काय म्हणाल्या आहेत सई या सगळ्यावर..

  बुलेटप्रूफ जॅकेट गेले कुठे ?

  ‘पप्पा गेले त्यावेळी मी बोस्टनला होते. याच काळात बहिणीचा पप्पा बुलेटप्रुफ जॅकेट (Bulletproof Jacket) घालून दहशतवाद्यांना रोखण्याला जात असल्याचा फोन आला होता. आपले पप्पा हे सुपरहिरो आहेत, आणि ते सगळ्यांना वाचवू शकतात, असे तेव्हा वाटे.  घरी आल्यावर टीव्हीवर हेमंत करकरे जखमी असल्याचा फ्लॅश आला, तेव्हाही पप्पांनी काही होणार नाही, असेच वाटत होते.

  त्यानंतर बहिणीचा पप्पा गेले असा मेसेज आला. त्याचा मोठा धक्का बसला होता. विमानतळावर रेड अलर्ट असल्याने दोन दिवसांनी आम्ही मुंबईत आलो. पप्पांच्या अंत्यविधीच्या वेळी पहिल्यांदा एवढ्या मोठ्या गर्दीला आणि मीडियाला सामोरे गेलो. पोस्टमार्टेमच्या यादीत बरेच सामान होते, पण बुलेटप्रूफ जॅकेट गायब होते. हे कसे झाले, याचा मला धक्का बसला.

  हे जॅकेट गेले कुठे या प्रश्नाचा शोध आई घेत होती. त्यावेळी चिदम्बरम यांनी माफीही मागितली होती. त्या काळात आईच्या प्रकृतीची चिंता होती, त्यावेळी वनिता कामटे यांनी खूप मदत केली. अनेक जण त्यावेळी करकरे हे गोंधळलेले होते असे सांगतात. पण असे नव्हते. त्यांनी सैन्यदलाला बोलावण्यास सांगून, कामा हॉस्पिटलला वेढा देण्यास सांगितले होते. त्यांचे व्हॉईस रेकॉर्ड्स उपलब्ध आहेत. त्या सगळ्या काळात आईने आम्हाला सावरले.

  बाबा जेव्हा व्हिएन्नाला डिप्लोमॅट होते, तेव्हा त्यांना अनेक संधी होत्या. पण त्यांना देशात येऊन पोलीस दलात राहून देशाची सेवा करायची होती. एटीएस प्रमुखपद हे धोक्याचे आहे, असे आम्हाला वाटे, पण पप्पांना असे कधीच वाटले नाही. गणवेश घातला आहे तर देशाची सेवा करु, असे त्यांचे ध्येय होते. आजही अनेकजण त्यांच्याबद्दल चंगले बोलत नाहीत, त्याने त्रास होतो.

  पप्पा गंभीर होते, ज्याने गुन्हा केला आहे, त्याला शिक्षा मिळायलाच हवी, अशी त्यांची धारणा असे. मग तो कुणीही असेल, त्याला शिक्षा मिळावी यासाठी ते प्रयत्नशील असत. त्यांना पुस्तके वाचण्याची आवड होती. अनेकदा आजूबाजूचे सगळे ते पुस्तके वाचताना विसरुन जात असत.

  त्यावेळी मी डिप्रेशनमध्ये होते, यातून बाहेर येण्यासाठी २००८ साली मी पप्पांवर पुस्तक लिहिले. जसजसे लिहित गेले तसतसे पप्पा गेल्याचे दुख कमी होत गेले. मला त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली. पप्पा त्यांच्या व्यग्र दिनक्रमातूनही कुटुंबांसाठी आणि माणसांसाठी वेळ काढत, आता त्याचं आश्चर्य वाटतं.

  पप्पांबाबत विचारत असलेले प्रश्न गरजेचे आहेत. ते आत्ता विचारले नाहीत, तर त्यांची उत्तरे मिळणार नाहीत. मुंबई हल्ल्यावेळी दहशतवाद्यांकडे आधुनिक शस्त्रास्त्रे होती. तर पोलिसांकडे जुन्ही हत्यारे होती. मात्र ती घेऊन ते सगळे लढले. हे सगळं बदलण्याची गरज आहे. हे सगळं बदललं असेल अशी आशा आहे.

  पप्पा सांगायचे जे कराल ते मनापासून करा. न्यू इंग्लंडमध्ये फॉल सीझन खूप सुंदर असतो. प्रत्येकवर्षी झाडाला नवी पालवी फुटते. परिवर्तन जगाचा नियम आहे. जो येईल त्याला जायचेच आहे.’