धर्माच्या नावाखाली राजकारण करणार्‍या भाजपने रामाच्या, विठोबाच्या, खंडोबाच्या जमीनीही सोडल्या नाहीत;  नवाब मलिकांचा देवस्थान घोटाळ्याचा आरोप

बीड जिल्ह्यातील एकट्या आष्टी तालुक्यात देवस्थानाची ५१३ एकर जमीन भाजपच्या नेत्यांनी हडप केली असून एकीकडे धर्माच्या नावाखाली राजकारण करणार्‍या भाजपने रामाच्या...विठोबाच्या... खंडोबाच्या. जमीनीही सोडल्या नाहीत असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला(Nawab Malik accuses BJP MLAs of temple scam).

    मुंबई : बीड जिल्ह्यातील एकट्या आष्टी तालुक्यात देवस्थानाची ५१३ एकर जमीन भाजपच्या नेत्यांनी हडप केली असून एकीकडे धर्माच्या नावाखाली राजकारण करणार्‍या भाजपने रामाच्या…विठोबाच्या… खंडोबाच्या. जमीनीही सोडल्या नाहीत असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला(Nawab Malik accuses BJP MLAs of temple scam).

    ५१३ एकर जमिनीच्या कागदपत्रांत फेरफार

    बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात तीन मुस्लिम देवस्थाने आणि सात हिंदू देवस्थानांच्या ५१३ एकर जमिनीच्या कागदपत्रांत फेरफार करुन त्यावर खासगी नाव चढवले. तसेच त्याचे प्लॉटिंग करुन हजारो कोटींचा घोटाळा करण्यात आला. या प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस आणि आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या नावाचा समावेश असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

    दहा देवस्थानांचा जमीन घोटाळा

    राष्ट्रवादीचे बीड जिल्ह्यातील नेते राम खाडे यांनी आष्टी तालुक्यातील दहा देवस्थानांचा जमीन घोटाळा समोर आणला असल्याचे नवाब मलिक यांनी यावेळी सांगितले. यात वक्फ बोर्डाच्या चिंचपूर मस्जिद इनाम – ६० एकर, रुई नालकोल – बुहा देवस्थान – १०३ एकर, देवीनिमगाव – मस्जिद इनाम – ५० एकर अशा दर्गा इनामच्या तीन देवस्थानांच्या २१३ एकर जमिनीचा समावेश आहे. त्याचबरोबर हिंदू देवस्थानामधील मुर्शीदपूर येथील विठोबा देवस्थानची ४१ एकर ३२ गुंठे, खंडोबा देवस्थान ३५ एकर, श्रीराम देवस्थान २९ एकर, कोयाळ येथील श्रीराम देवस्थान १५ एकर, चिंचपूर रामचंद्रदेव देवस्थान ६५ एकर, बेळगाव खंडोबा देवस्थान ६० एकर आणि खडकत विठोबा देवस्थान ५० एकर अशी हिंदू देवस्थानांची ३०० एकर जमीन खालसा करण्याचे काम अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आले. अशी एकूण ५१३ एकर जमीन खालसा केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी यावेळी केला.

    देवस्थानाच्या जमिनी हडप

    २०१७ सालापासून हा उद्योग सुरु असल्याचेही नवाब मलिक म्हणाले. २०१७ पासून २०२०पर्यंत देवस्थानाच्या जमिनी हडप केल्या गेल्या आहेत. या प्रकरणाचा तपास योग्यरीतीने व्हावा यासाठी गृहमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी यासाठी एसआयटीची नेमणूक केली. एसआयटीने दोन गुन्हे दाखल करुन तपास सुरु केला आहे. राम खाडे यांनी गृह, महसूल आणि ईडीकडे या दहा प्रकरणांची तक्रार दाखल केली आहे. मच्छिंद्र मल्टिस्टेट को.ऑ.सोसायटीचा सहभाग या घोटाळ्यात आहे. या सर्व जागा खालसा करत असताना या कोऑपरेटिव्हच्या माध्यमातून जे बगलबच्चे तयार करण्यात आले त्यांच्या खात्यात पैसे गेले. त्यातून खरेदी खत करण्यात आले. या सर्व प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस आणि माजी आमदार भीमराव धोंडे या दोन आमदारांचे नाव असल्याचा दावाही नवाब मलिक यांनी केला आहे.

    बीड जिल्ह्यात एफआयआर दाखल

    काही दिवसांपूर्वी ईडीच्या माध्यमातून बातमी पेरली होती की वक्फ बोर्डाच्या कार्यालयावर छापेमारी झाली आहे. आम्ही त्यावेळीच पत्रकार परिषद घेऊन याबाबत कोणतीही छापेमारी झाली नसल्याचा खुलासा केला होता. महाराष्ट्रामध्ये बोर्डाच्या माध्यमातून ११ एफआयआर दाखल केले आहेत. मंदिर आणि मशीदीच्या जागेवर फेरफार करुन, खासगी नावे चढवून प्लॉटिंग करत ही जमीन विकल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर नांदेड, औरंगाबाद, परभणी, जालना, पुणे, ठाणे आणि बीड जिल्ह्यात एफआयआर दाखल करण्यात आले आहेत, अशी माहितीही नवाब मलिक यांनी यावेळी दिली.