नवाब मलिक यांचे देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर चौफेर टिकास्त्र

नवाब मलिक यानी पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांच्या टिकेला उत्तर देताना आरोप केला आहे की फडणवीस सरकारच्या काळात डिजीटल दलाल होते. फडणवीस सरकारच्या काळात काय- काय घोटाळे झाले हे लवकरच बाहेर काढू, असा इशाराही नवाब मलिकांनी दिला.

  मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर टिका करत सवाल केले आहेत.

  डिजीटल दलालीचे घोटाळे बाहेर काढू

  नवाब मलिक यानी पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांच्या टिकेला उत्तर देताना आरोप केला आहे की फडणवीस सरकारच्या काळात डिजीटल दलाल होते. फडणवीस सरकारच्या काळात काय- काय घोटाळे झाले हे लवकरच बाहेर काढू, असा इशाराही नवाब मलिकांनी दिला.

  काश्मीरमध्ये सातवर्षापासून परिस्थिती का सुधारत नाही

  मलिक म्हणाले की, लोकांची हत्या होत आहे लोक जम्मू काश्मीर सोडून पलायन करत आहेत. आतंकवादी हल्ले थांबत नाहीत. सात वर्षांपासून तुमच्याकडे केंद्राचे सरकार आहे. गेल्या दोन वर्षांपासून तुम्ही काश्मीरमध्ये सरकार चालवत आहात. त्यापूर्वी तुम्ही काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत सत्तेत होता. मग तेथील परिस्थिती का सुधारत नाही याचे उत्तर जनतेला देण्याची गरज आहे. जम्मू काश्मीरच्या परिस्थितीवर प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार संघाला नाही. जम्मू काश्मीरची स्वायत्तता संपवूनही दहशतवादी कारवाया का थांबत नाही, असा सवाल नवाब मलिकांनी केला.

  शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आले

  मलिक म्हणाले की, केंद्र शेतकरी आंदोलनाला गांभीर्याने घेत नाही. आंदोलन भटकेल  असे त्यांना वाटते. लखीमपूर खेरी मध्ये ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची हत्या करत शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आले त्या ऐवजी आंदोलन चर्चेतून सोडवले पाहीजे. शरद पवार त्यासंदर्भात सूचक बोलत होते हे केंद्र सरकारला कळायला हवे, असे नवाब मलिक म्हणाले.

  आता कुणाच्या नशिबाने किंमत वाढते

  मलिक म्हणाले की, भाजप सत्ता आली की पेट्रोल डिझेलचे दर कमी करु, असे आश्वासन देत होते. संसद चालू देणार नाही ही भूमिका घेत होते. आत्ता मोदींनी सांगावे की दर का वाढले. यूपीएच्या काळात भाजपवाल्यांनी तेव्हा थयथयाट केला, दिल्लीच्या निवडणुकीत मोदींनी सांगितले की माझ्या नशिबांनी किंमत कमी झाली आता कुणाच्या नशिबाने किंमत वाढतेय, हे देखील त्यांनी सांगावे असा सवाल  नवाब मलिक यांनी केला.