बरोबर एक वर्षापूर्वी आजच्याच दिवशी माझ्या आयुष्यातील एक आनंददायी क्षण मी अनुभवला होता; धनंजय मुंडे

मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांची महाविकास आघाडीने सरकारची नुकतीच वर्षपूर्ती झाली. हे सरकार फार काळ टिकणार नाही असा दावा विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. याला महाविकास आघाडीचे नेते जशास तसे उत्तर देत आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला देखील एक वर्ष पूर्ण झाले आहे. या निमित्ताने महाविकास आघाडीतील मंत्री तथा राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी ट्विट करत या शपथविधी सोहळ्याच्या आठवींना उजाळा दिला आहे.

बरोबर एक वर्षापूर्वी आजच्याच दिवशी माझ्या आयुष्यातील एक आनंददायी क्षण मी अनुभवला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार महाविकास आघाडीच्या सर्व शिल्पकारांचे मला मंत्री मंडळात संधी दिल्याबद्दल धन्यवाद. आधुनिक महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी मी शपथबध्द आहे. असे ट्विट करत शपथविधी सोहळ्याच्या आठवणीच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदाच्या आग्रहामुळे भाजपचं सत्तासमीकरण जुळत नव्हतं. त्यावेळी शरद पवार आणि संजय राऊत यांनी पुढाकार घेऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या नावाला पाठिंबा देत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आले होते.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांची महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर २८ नोव्हेंबर रोजी शिवतीर्थावर या आघाडीच्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच आघाडीतील तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी दोन अशा सहा कॅबिनेट मंत्र्यांना यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली.

यानंतर महिनाभरानंतर उद्धव ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. ३० नोव्हेंबर रोजी विधानभवनात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. २६ जणांनी कॅबिनेट तर १० जणांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.