राष्ट्रवादीने व्टिट केली पवारांची ‘ती’ चित्रफित: दिल्लीच्या तख्त़ासमोर महाराष्ट्र झुकत नाही, इतिहासाची पुनरावृत्ती करणारा हाच तो दिवस!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही आठवण शेअर करताना 'सूडाच्या राजकारणाला मात देणारा, महाराष्ट्रातील घडामोडींना निर्णायक वळण देणारा, दिल्लीच्या तख्त़ासमोर महाराष्ट्र झुकत नाही, या इतिहासाची पुनरावृत्ती करणारा हाच तो दिवस.

  मुंबई: शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमागे ईडी कारवाईचा ससेमिरा सुरू असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसने दोन वर्षापूर्वी शरद पवार यांनी ईडीला आव्हान देत स्वत:च चौकशीला जाण्याबाबत वक्तव्य केलेली चित्रफित व्हायरल केली आहे. दोन वर्षापूर्वी आजच्याच दिवशीचा (२७ सप्टेंबर) राज्यातील राजकीय घडामोडींना कलाटणी मिळाली असे म्हणत राष्ट्रवादीने ही चित्रफित समूह माध्यमांवर जारी केली आहे.

  पवारांची ईडीला अंगावर घेण्याची भूमिका
  २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ईडीने नोटीस बजावल्याची चर्चा होती. त्यावर शरद पवार काय भूमिका घेतात याबाबत उत्सुकता असतानाच पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन ‘२७ सप्टेंबर रोजी दुपारी मी स्वत: ईडीच्या कार्यालयात हजर राहणार. माझ्या संदर्भातील जी काही माहिती त्यांना हवी असेल ती देणार. त्याशिवाय, त्यांचा जो काही पाहुणचार असेल तोही घेणार, असे जाहीर केले होते. पवारांनी ईडीला थेट अंगावर घेण्याची भूमिका घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली. कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.

  चौकशीसाठी येण्याची गरज नाही
  पवारांसोबत सर्व कार्यकर्ते ईडीच्या कार्यालयात जाणार, असे जाहीर करण्यात आले. अखेर ईडीने स्वत:च पवार यांना चौकशीसाठी येण्याची गरज नाही. तूर्त त्याची आवश्यकता नाही, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर पवार ईडीच्या कार्यालयात गेले नाहीत. मात्र, त्यातून त्यांनी विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक जोश निर्माण केला. सत्ताधा-यांच्या दबावतंत्राला झुगारून त्यातून त्यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्याने हा दिवस महत्वाचा असल्याचे राष्ट्रवादीने नमूद केले आहे.

  तख्त़ासमोर महाराष्ट्र झुकत नाही
  राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही आठवण शेअर करताना ‘सूडाच्या राजकारणाला मात देणारा, महाराष्ट्रातील घडामोडींना निर्णायक वळण देणारा, दिल्लीच्या तख्त़ासमोर महाराष्ट्र झुकत नाही, या इतिहासाची पुनरावृत्ती करणारा हाच तो दिवस…,’ असे म्हटले आहे.