स्थानिक निवडणुकांत राष्ट्रवादी देणार स्वबळाला प्राधान्य; पण…

स्थानिक स्वराज्य संघासह पराभूत झालेल्या विधानसभेच्या जागांवरही राष्ट्रवादीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी परिवार यात्रा काढून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता.

  मुंबई : केंद्रात सहकार विभाग सुरु झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) मोठ्या प्रमाणात सक्रीय झाले आहेत. राज्यातील सहकार क्षेत्रावर केंद्रातील नव्या खात्याच्या माध्यमातून भाजप नियंत्रण आणायचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी नुकताच केला आहे. त्यानंतर आज पवार यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व मंत्री, खासदार, आजी-माजी आमदारांची बैठक पार पडली. यावेळी पवारांनी सर्वांकडून मतदारसंघाचा आढावा घेतला. तसेच त्यांच्या मतदारसंघातील तक्रारी आणि सूचनाही जाणून घेतल्या. आगामी विधानसभा निवडणुकीत सहकार क्षेत्राशी संबंधित नेत्यांशिवाय अन्य क्षेत्रातील मोहऱ्यांवरही या बैठकीत लक्ष देण्याचे संकेत मिळाले आहेत.

  स्थानिक संस्थेच्या निवडणुकीत स्वबळाला प्राधान्य

  येत्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कुणाशाही सरसकट आघाडी किंवा युती केली जाणार नाही. स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, असे या बैठकीनंतर प्रवक्ते नबाब मलिक यांनी सांगितले. २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने ११४ जणाना उमेदवारी दिली होती. त्यातील ५५ जणांची मते पवार यानी जाणून घेतली तर ५४ जणांचा निवडणुकीत विजय झाला होता. या बैठकीला विद्यमान खासदार, आमदार मंत्रीही उपस्थित होते. यावेळी मतदारसंघातील परिस्थिती, तिथले प्रश्न आदी मुद्दे तसेच सरकारकडून असलेल्या अपेक्षाही व्यक्त करण्यात आल्या. या बैठकीत ज्या सूचना मांडण्यात आल्या आहेत. त्याची नोंद मंत्र्यांनी घेतली आहे. सरकारच्या माध्यमातून या प्रश्नांची सोडवणूक केली जाणार आहे, अशी माहिती मलिक यांनी दिली.

  ओबीसींच्या आरक्षित जागी ओबीसीच उमेदवार

  ओबीसी आरक्षणाबाबतचा डेटा वेळेत मिळाला नाही आणि निवडणुका लागल्या तरी आम्ही ओबीसींना पूर्ण न्याय देऊ. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ज्या ठिकाणी ओबीसींसाठी जागा आरक्षित होत्या त्या ठिकाणी ओबीसीच उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मलिक यांनी दिली. दरम्यान, तीन वर्षानंतर विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक होणार आहे. तसेच पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही होणार आहेत. त्यासाठी राष्ट्रवादीने जोरदार तयारी सुरू केली आहे.

  राष्ट्रवादीचे अनेक माजी नेते ‘घरवापसी’च्या प्रतिक्षेत

  स्थानिक स्वराज्य संघासह पराभूत झालेल्या विधानसभेच्या जागांवरही राष्ट्रवादीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी परिवार यात्रा काढून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता. आजची बैठक सुद्धा मतदारसंघातील मोर्चेबांधणीचा भाग असल्याचे सांगितले जात आहे. त्याचप्रमाणे मागील निवडणुकांमध्ये पक्षाशी फारकत घेतलेल्या अनेकांच्या घरवापसीची सुरूवात आता होण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने पवार यानी चाचपणी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. येत्या काळात अनेक माजी राष्ट्रवादी नेते घरवापसी करण्याची शक्यता असून, आगामी विधानसभा निवडणुकीत सहकार क्षेत्राशी संबधीत नेत्यांशिवाय अन्य क्षेत्रातील मोह-यांवरही लक्ष देण्याची गरज असल्याचे या बैठकीतून दिसून आल्याची माहिती सूत्रांनी दिली.