दुपारनंतर शेअर बाजारात जोरदार उसळी, शेअर बाजाराने बदलला नूर

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात सातत्यानं पडझड होत असल्याचं चित्र गेल्या आठवड्यापासून दिसायला सुरुवात झाली होती. या आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच सोमवारपासून शेअर बाजारात विक्रीची लाट यायला सुरुवात झाली होती. सोमवारपासून गुरुवारपर्यंत सलग चार दिवस शेअर बाजार लाल रंगात बंद होत होता. आजदेखील मोठ्या आपटीसह शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाले, मात्र दुपारनंतर हे चित्र बदललं.

    गेल्या सहा दिवसांपासून सातत्यानं आपटी खाणाऱ्या भारतीय शेअर बाजारात दुपारनंतर खरेदीची जोरदार लाट पाहायला मिळाली. कोरोनाच्या भीतीमुळे गेले आठवडाभर भयभीत झालेल्या शेअर बाजारात अचानक आत्मविश्वास परतल्याचं चित्र दिसल्यामुळे गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा मिळाला.

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात सातत्यानं पडझड होत असल्याचं चित्र गेल्या आठवड्यापासून दिसायला सुरुवात झाली होती. या आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच सोमवारपासून शेअर बाजारात विक्रीची लाट यायला सुरुवात झाली होती. सोमवारपासून गुरुवारपर्यंत सलग चार दिवस शेअर बाजार लाल रंगात बंद होत होता. आजदेखील मोठ्या आपटीसह शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाले, मात्र दुपारनंतर हे चित्र बदललं.

    अचानक खरेदीची लाट आल्यामुळे बाजारातील पडझड थांबून खरेदीला सुरुवात झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. विशेषतः ऊर्जा क्षेत्रातील समभाग आज चांगलेच वधारले. सुरुवातीच्या सत्रात पेट्रोलिअम क्षेत्रातील समभागांची जोरदार विक्री होत असल्याचं चित्र होतं. मात्र दुपारनंतर रिलायन्ससह अनेक पेट्रोलिअम कंपन्यांच्या समभागांमध्ये खरेदी होत असल्याचं चित्र दिसलं. त्यामुळं दुपारनंतर निफ्टी आणि सेन्सेक्स या दोन्ही निर्देशांकात वाढ झाली.

    सकाळी सुमारे २०० अंशांनी आपटलेला निफ्टी १८५ अंशांच्या वाढीसह बंद झाला. तर सकाळी सुमारे ५०० अंशांनी आपटी खाणारा सेन्सेक्स ६४० अंशांच्या वाढीसह बंद झाला. परदेशी गुंतवणूक संस्थांनी भारतीय शेअर बाजारात जोरदार खरेदीला सुरुवात केल्यामुळे चित्र बदलल्याचं शेअर बाजारातील तज्ज्ञांचं मत आहे. पुढील आठवड्यातही ही तेजी कायम राहण्याचा अंदाज वर्तवला जातोय. तर गुंतवणूकदारांनी मात्र प्रत्येक पडझडीनंतर नवी खरेदीची संधी शोधावी, असा सल्लाही दिला जातोय.