भूमिकाच घ्यायची नाही, हे मुख्यमंत्र्यांचे वैशिष्ट्य; प्रविण दरेकरांची टीका

कितीही गंभीर प्रकरण असले तरी भूमिकाच घ्यायची नाही, हे मुख्यमंत्र्यांचे वैशिष्ठ राहिले आहे, पण मुख्यमंत्री म्हणून भूमिकाचं न घेणे, हे राज्याला परवडणार नाही, अशी टीका दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली.

    मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या प्रकरणावरुन विरोधी पक्ष प्रचंड आक्रमक झाला आहे. राज्यभरात भाजपच्या वतीने अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करण्यात येत आहेत. याचं पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

    याबाबत दरेकर पत्रकार परिषदेत म्हणाले की बदल्यांमधील भ्रष्टाचाराच्या प्रकरणाशी अनेक आयपीएस अधिकारी जोडले असून, काही राजकीय नेत्यांचाही अंतर्भावही दिसून येत आहे. आयपीएस अधिकाऱ्यांच्या सेवा केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्यामुळे देवेंद्र फडणवीस दिल्ली येथे जाऊन संबंधित सचिवांना भेटून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करणार आहेत. तसेच राज्यातील पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.  सरकारकडे पुरावे असण्याऐवजी देवेंद्र फडणवीस पुरावे देत आहेत. असं दरेकर म्हणाले.

    दरम्यान पुढे बोलतांना दरेकर म्हणाले की,  खरे तर एखादी गोष्ट उघड झाल्यानंतर सरकारने दखल घेऊन, चौकशी करून, पुरावे गोळा करून कार्यवाही करण्याची आवश्यकता असते. परंतु, मागील काही प्रकरणात स्वतः देवेंद्र फडणवीसचं माहिती, पुरावे, दस्तावेज शोधण्याचे काम करीत आहेत.  हे सरकार निष्क्रिय आहे. हे सरकार येऊन सव्वा वर्षाचा काळ झाला, या दरम्यान अनेक प्रकरणे घडली,  पूजा चव्हाण प्रकरणात २० दिवस एफआयआर झाला नव्हता, मंत्र्यांचा राजीनामा घेतला नव्हता,  राजीनामा घेऊन दोन दिवस खिशात ठेवला होता, म्हणजे, कितीही गंभीर प्रकरण असले तरी भूमिकाच घ्यायची नाही, हे मुख्यमंत्र्यांचे वैशिष्ठ राहिले आहे, पण मुख्यमंत्री म्हणून भूमिकाचं न घेणे, हे राज्याला परवडणार नाही, अशी टीका दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली.