ओबीसी मंत्रीच वातावरण बिघडवत आहेत; मराठा आरक्षणावरुन विनायक मेटेंची संतप्त प्रतिक्रिया

मुंबई:  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर आणि राज्यातील ओबीसी मंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे.

मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देण्याची मागणी कोणत्याही मराठा नेत्याने केलेली नाही. अशावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे हे राज्यातील वातावरण खराब करत असल्याचा आरोप विनायक मेटे यांनी केला आहे.

सरकारला मराठा समजाला आरक्षण द्यायचे नाही का? ओबीसींचे मोर्चे, आंदोलने सरकार पुरस्कृत आहेत का? तसेच सरकारने दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे का? असा सवालही विनायक मेटे यांनी उपस्थित केला आहे.

विनायक मेटे यांनी पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारने ठोस पावले उचलली नसल्याने मराठा तरुणांमध्ये प्रचंड असंतोष असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, त्यामुळे काही परिस्थिती निर्माण झाली तर त्याला सरकारच जबाबदार असेल.

मराठा समाजातील कोणत्याही नेत्याने ओबीसींमधून आरक्षण मागितले नाही. पण, ठाकरे सरकारमधील ओबीसी मंत्री आणि राज्यातील ओबीसी नेते मराठा आरक्षणावरून बेताल वक्तव्य करत आहेत. त्यांनी मोर्चे, आंदोलने सुरू केली  आहेत.  त्यांचे वातावरण चिघळवायचे प्रयत्न सुरू आहे. ओबीसी नेत्यांचे हे मोर्चे, मेळावे सरकार पुरस्कृत आहेत का? राज्यातील मंत्री छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार आणि शेंडगे हे राज्यातील वातावरण खराब करत असून सरकारने त्यांच्यावर कोणताही अंकूश ठेवलेला नाही. त्यामुळे सरकारने राज्यातील वातावरण खराब करण्याचा निर्णय घेतला आहे का? दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा, द्वेष निर्माण करण्याचा कार्यक्रम सरकारने हाती घेतला आहे का? असे सवाल मेटे यांनी केले.