corona in dharavi

धारावीसारख्या झोपडपट्ट्यांमध्ये विषाणूचा झपाट्याने(Omicron Spread) प्रसार होत असल्याने पालिकेची यंत्रणा सतर्क झाली आहे. हवाईमार्गे येणाऱ्या प्रवाशांवर करडी नजर ठेवली जात आहे.

    मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली असून धारावीत(Dharavi) महिनाभरात १७ वेळा शून्य रुग्णाची नोंद झाली आहे. मात्र आता मुंबईत (Mumbai)ओमायक्रॉनने शिरकाव केल्यानंतर पालिकेची यंत्रणा कामाला लागली आहे. धारावीसारख्या झोपडपट्ट्यांमध्ये विषाणूचा झपाट्याने(Omicron Spread) प्रसार होत असल्याने पालिकेची यंत्रणा सतर्क झाली आहे. हवाईमार्गे येणाऱ्या प्रवाशांवर करडी नजर ठेवली जात आहे. धारावीत बहुतांश सार्वजनिक शौचालयाचा वापर केला जातो. त्यामुळे विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी येथील शौचालयांचे सॅनिटायझेशन वाढवण्यात आले आहे.

    मुंबईसह राज्यात ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्याने चिंता वाढली आहे. सध्या कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. महिनाभरात १७ वेळा शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. असे असले तरी ओमायक्रॉनचा धोका वाढतो आहे. मुंबईत ओमायक्रॉनचे दोन रुग्ण सापडले आहेत. टांझानियातून धारावीत आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तो ओमायक्रॉनचा रुग्ण आहे का यासाठी जिनोम सिक्वेन्सिंगच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. हा प्रवासी अनेकांच्या संपर्कात आल्याची शक्यता असल्याने चिंता वाढली आहे. मागील महिनाभरात धारावीत मोठी रुग्ण वाढ झालेली नाही. तसेच एका महिन्यात तब्बल १६ ते १७ वेळा शून्य रुग्ण आढळले आहेत. गेल्या आठ दिवसांपैकी येथे पाच दिवस एकही रुग्ण नोंद झालेली नाही. मात्र ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सतर्क झाली आहे. विशेषत: धारावीसारख्या गजबजलेल्या झोपडपट्टयांत हा नवा घातक विषाणू पसरु नये याची खबरदारी घेतली जाते आहे.

    महापालिकेने केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे मुंबईतील कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात असताना गेल्या काही दिवसांपासून ओमायक्रॉनच्या संभाव्य धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे दाटीवाटीची वस्ती असलेल्या धारावीवर राज्य सरकार आणि पालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत धारावीत मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत होते. दररोजची रूग्ण संख्या ४०० हून अधिक नोंदवली जात होती. पालिकेने ‘मिशन झिरो’, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ यासह विविध प्रकारच्या उपाययोजना राबवल्या. परिणामी धारावी जवळपास कोरोनामुक्त झाली आहे.

    धारावीतील रुग्णसंख्या घटली असली तरी ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या सर्व उपाययोजना सुरू आहेत. हवाईमार्गे परदेशातून मुंबईत येणाऱ्या नवीन प्रवाशाची विमानतळावर तपासणी केली जाते. मुंबईत येणारा प्रवासी कोणत्या भागात जाणार आहे, याची माहिती पालिकेच्या संबंधित विभागांना दिली जाते. याची आधीच माहिती मिळत असल्याने प्रवाशाची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली तरी खबरदारीसाठी पालिकेचे पथक या प्रवाशावर लक्ष ठेवत आहे. सार्वजनिक स्वच्छता, शौचालयांचे सॅनिटायझेशन वाढवण्यात आले आहे.

    - किरण दिघावकर, सहाय्यक आयुक्त

    गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून धारावीतील रुग्ण संख्येचा आलेख सातत्याने खाली येतो आहे. गेल्या महिनाभरापासून धारावीत एक दिवसाआड शून्य रुग्ण नोंद होते आहे. धारावी विभागात आतापर्यंत कोरोनाबाधित ७,१७० रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी ६,७४५ रुग्ण बरे झाले आहेत तर विविध रुग्णालयात उपचाराधीन रुग्ण संख्या पाच आहे. रुग्ण संख्या नियंत्रणात असली तरी पालिकेची आरोग्य यंत्रणा येथे अद्याप कंबर कसून काम करत आहे. रुग्ण शोध, तपासणी, चाचण्या सुरूच आहेत. लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे, अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.