udhav thackrey

महाराष्ट्रातील शासकीय सेवेत सध्या एक लाखांपेक्षा जास्त पदे रिक्त असून सुशिक्षित आणि होतकरू तरूण वर्ग महाराष्ट्र लोकसेवा आयोग वर्ग-१, वर्ग-२ आणि वर्ग-३ विभागातल्या सेवाभरती प्रक्रियेकडे डोळे लावून आहे. यासंदर्भात होणारा विलंब त्यांच्यात नैराश्य आणि वैफल्य वाढविणारा ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संदर्भात तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांची मोठी संख्या लक्षात घेता सरकारने येणारे नवीन वर्ष २०२१ पासून, शासकीय सेवेत सध्या एक लाखांपेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. या पदांसाठी तातडीने सुधारित महापोर्टल तयार करुन भरतीप्रक्रिया सुरु करावी, अशी शिफारस विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.

महाराष्ट्रातील शासकीय सेवेत सध्या एक लाखांपेक्षा जास्त पदे रिक्त असून सुशिक्षित आणि होतकरू तरूण वर्ग महाराष्ट्र लोकसेवा आयोग वर्ग-१, वर्ग-२ आणि वर्ग-३ विभागातल्या सेवाभरती प्रक्रियेकडे डोळे लावून आहे. यासंदर्भात होणारा विलंब त्यांच्यात नैराश्य आणि वैफल्य वाढविणारा ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संदर्भात तातडीने निर्णय घेणे आवश्यक असल्याचे पटोले यांनी पत्रांत म्हंटले आहे.

कोविड-१९ महामारी संदर्भात परिस्थिती आता बऱ्यापैकी नियंत्रणात येत असल्याने येणारे नवीन वर्ष २०२१ पासून ही भरती प्रक्रिया सुधारित महापोर्टलद्वारे तातडीने सुरु करण्यात यावी. त्याचप्रमाणे कोरोना संदर्भात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे वयोमर्यादा अट शिथिल करण्यात यावी अशी शिफारसही पटोले यांनी या पत्राद्वारे केली आहे.

राज्यात मोठ्या संख्येने असणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांची भावना आणि राज्य सरकारकडून त्यांची असलेली अपेक्षा लक्षात घेता आपण यासंदर्भात लक्ष घालून तातडीने पावले उचलाल ही अपेक्षा, असे विधानसभा अध्यक्ष यांनी या पत्रात नमूद केले आहे.

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाच्या तसेच महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. राज्यातील मागील सरकारने मेगाभरतीचा फुगा फुगवून सुशिक्षित बेरोजगारांची दिशाभूल केल्याने तरूणांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात नैराश्याची भावना निर्माण झाली आहे. राज्याच्या अर्थचक्राला गती देणारा आणि राज्याच्या विकासात योगदान देणारा हा तरूण वर्ग अशा प्रकारे वैफल्यग्रस्त होणे उचित नाही असे ही त्यांचे म्हणणे आहे.