पाकची डोकेदुखी वाढली! पाकिस्तान आणि तुर्कस्तान एफएटीएफच्या ग्रे लिस्टमध्ये राहणार

दहशतवाद्यांविरोधात ठोस कारवाई केली नसल्यामुळे पाकिस्तान आणि तुर्कस्तान या दोन देशांना ग्रे लिस्टमध्ये ठेवण्याचा निर्णय एफएटीएफने घेतला. दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी एफएटीएफने ग्रे लिस्टमधील देशांना एप्रिल २०२२ पर्यंत मुदत दिली आहे. यानंतर ग्रे लिस्टमधील देशांना याच यादीत कायम ठेवावे की नाही याचा निर्णय एफएटीएफ नव्याने घेईल. त्यामुळं आता पाकिस्तान आणि तुर्कस्तान यांची डोकेदुखी वाढली आहे

  नवी दिल्ली : दहशतवाद हा जगाची मोठी समस्या झाली आहे. त्यामुळं दहशतवाद्यांचा समूळ नष्ट करण्यासाठी जगाने मोट बांधली असताना, अनेक देश दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यात अयशस्वी ठरले आहेत. आता आंतरराष्ट्रीय पातळीवरुन एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. दहशतवाद्यांविरोधात ठोस कारवाई केली नसल्यामुळे पाकिस्तान आणि तुर्कस्तान या दोन देशांना ग्रे लिस्टमध्ये ठेवण्याचा निर्णय एफएटीएफने घेतला. दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी एफएटीएफने ग्रे लिस्टमधील देशांना एप्रिल २०२२ पर्यंत मुदत दिली आहे. यानंतर ग्रे लिस्टमधील देशांना याच यादीत कायम ठेवावे की नाही याचा निर्णय एफएटीएफ नव्याने घेईल. त्यामुळं आता पाकिस्तान आणि तुर्कस्तान यांची डोकेदुखी वाढली आहे.

  एफएटीएफची कारवाई

  फायनॅन्शियल अॅक्शन टास्क फोर्स अर्थात एफएटीएफ दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या देशांवर आर्थिक निर्बंध लागू करतो. या निर्बंधांमधून बाहेर पडण्यासाठी संबंधित देशांना दहशतवाद्यांविरोधात ठोस कारवाई करण्याची अट घातली जाते. एफएटीएफने दहशतवाद्यांविरोधात ठोस कारवाई करण्यासाठी ३४ अटी निश्चित केल्या आहेत. पाकिस्तानने यापैकी ३० अटींचे पालन केले असले तरी अतिशय महत्त्वाच्या चार अटींचे पालन केलेले नाही, असे एफएटीएफने सांगितले. संयुक्त राष्ट्रांनी निवडक दहशतवादी आणि दहशतवादी संघटना यांना काळ्या यादीत टाकले आहे. संबंधित दहशतवादी आणि दहशतवादी संघटना यांच्या विरोधात पाकिस्तानला कठोर कारवाई करावीच लागेल; असेही एफएटीएफने सांगितले.

  पाकिस्तान जून २०१८ पासून ग्रे लिस्टमध्ये

  पाकिस्तान एफएटीएफच्या ग्रे लिस्टमध्ये जून २०१८ पासून आहे. ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्यात पाकिस्तान अद्याप यशस्वी झालेला नाही. एफएटीएफच्या ग्रे लिस्टमध्ये समावेश झाल्यामुळे पाकिस्तानवर अनेक आर्थिक निर्बंध लागू झाले आहे. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांकडून पाकिस्तान आधीप्रमाणे सहजतेने कर्ज घेऊ शकत नाहीत. आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी मदत मिळवणेही पाकिस्तानसाठी कठीण झाले आहे.

  १२ देशांचा ग्रे लिस्टमध्ये समावेश

  एफएटीएफने उत्तर कोरिया आणि इराण या दोन देशांना २०१९ पासून काळ्या यादीत (ब्लॅक लिस्ट) टाकले आहे. जॉर्डन, माली, तुर्कस्तान या देशांचा ग्रे लिस्टमध्ये नव्याने समावेश झाला. या व्यतिरिक्त बहामास, कंबोडिया, इथिओपिया, घाना, पाकिस्तान, पनामा, श्रीलंका, सीरिया, त्रिनिदाद आणि टोबॅगो, ट्युनिशिया आणि येमेन हे देश ग्रे लिस्टमध्ये आहेत. मॉरिशस आणि बोत्सवाना या दोन देशांना ग्रे लिस्टमधून वगळण्यात आले आहे.