फरार घोषित करण्यात आलेले परमबीर सिंह अखेर मुंबईत दाखल, गुन्हे शाखेच्या कार्यालयात लावली हजेरी

मुंबईसह (Mumbai)विविध ठिकाणी दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये (Crime) फरार घोषित करण्यात आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि होमगार्डचे महासंचालक परमबीर सिंह (Parambir Singh Back In Mumbai) आज मुंबईत दाखल झाले आहेत.

    मुंबईः मुंबईसह (Mumbai)विविध ठिकाणी दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये फरार घोषित करण्यात आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि होमगार्डचे महासंचालक परमबीर सिंह (Parambir Singh Back In Mumbai) आज मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबई गुन्हे शाखेच्या(Mumbai Crime Branch) कांदिवली कार्यालयात ते आज हजर झाले आहेत.

    सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण मिळताच परमबीर सिंह चंदीगडमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत येऊन तपासयंत्रणांना चौकशीत सहकार्य करणार असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले होते. त्यानुसार ते आज मुंबईत चौकशीसाठी दाखल झाले आहेत.

    व्यावसायिकाकडून खंडणी मागितल्याच्या कथित गुन्ह्यात आरोप म्हणून परमबीर सिंह यांना मुंबईतील अतिरिक्त मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने फरार घोषित केले होते. परमबीर यांच्याबरोबरच आरोपी निलंबित पोलिस अधिकारी रियाज भाटी व विनय सिंह उर्फ बबलू यांनाही न्यायालयाने फरार घोषित केले. परमबीर सिंह ३० दिवसांत न्यायालयात हजर न झाल्यास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अर्जाप्रमाणे व न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे त्यांची संपत्ती जप्त होण्याची कायदेशीर कारवाई सुरू होऊ शकते. त्यानुसार आज ते गोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या कांदिवली कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले आहेत.