परमबीर सिंह यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव, गृहमंत्री अनिल देशमुख यांची CBI चौकशी व्हावी

गृहमंत्री अनिल देशमुख यांची CBI चौकशी व्हावी, मुंबई पोलिस आयुक्तपदावरून झालेली बदली बेकायदेशीर ठरवावी आणि पुढील कारवायांपासून संरक्षण मिळावे, अशा प्रकारच्या मागण्या परमबीर सिंह यांनी याचिकेत केल्या आहेत.

  मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या वसुलीच्या आरोपांबाबत तसेच स्वत:च्या बदलीबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र काल सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी हायकोर्टात जाण्याचा आदेश परमबीर सिंह यांना दिला. त्यानंतर आज त्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

  परमबीर सिंह यांच्या याचिकेत कोण-कोणत्या मागण्या?

  गृहमंत्री अनिल देशमुख यांची CBI चौकशी व्हावी, मुंबई पोलिस आयुक्तपदावरून झालेली बदली बेकायदेशीर ठरवावी आणि पुढील कारवायांपासून संरक्षण मिळावे, अशा प्रकारच्या मागण्या परमबीर सिंह यांनी याचिकेत केल्या आहेत.

  गृहमंत्री देशमुख यांच्या निवासस्थानी ज्या-ज्या व्यक्तींच्या बैठका झाल्या त्याचे पुरावे मिळण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची जपणूक होणे अत्यंत आवश्यक आहे. पुरावे नष्ट केले जाऊ शकतात. त्यामुळे सीबीआयसारख्या स्वतंत्र यंत्रणेला ते ताब्यात घेण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

  तसेच पोलिसांच्या नियुक्त्या, बदल्या यामध्ये राजकीय नेत्यांकडून हस्तक्षेप होऊ नये, याविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंतीही परमबीर यांनी याचिकेत केली आहे.

  सचिन वाझे आणि संजय पाटील या पोलिस अधिकाऱ्यांमार्फत हॉटेल व्यवसायिकांकडून खंडणी उकळण्याचे लक्ष्य गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ठेवले. त्यामुळे खुद्द राज्याच्या गृहमंत्र्यांकडूनच होत असलेल्या या भ्रष्टाचाराची सीबीआयमार्फत चौकशी होणे गरजेचे, असेही परमबीर यांनी याचिकेत म्हटले आहे.

  दरम्यान वसुलीच्या आरोपांवरून गृहमंत्री अनिल देशमुखांच्या चौकशीची मागणी परमबीर सिंह यांच्यासह सातत्याने भाजपकडूनही होत आहे. त्यावर काल रात्री उशिरा ट्विट करत गृहमंत्र्यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर चौकशी लावावी, एकदा काय ते दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊ दे!