Cleaning of cemeteries, cemeteries; Hiring a contractor at a lower rate will create a new controversy

मुंबईतील स्मशानभूमी, दफनभूमींची स्वच्छता करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी नेमण्यात येणाऱ्या कंत्राट कामांसाठी चक्क उणे ४६ टक्के कमी दरात बोली लावणाऱ्या कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र उद्यान आणि मैदानांच्या देखभालीमध्ये कमी बोली लावण्यात आल्याने निविदा रद्द करण्यात आल्या होत्या. मग स्मशानभूमींच्या कमी बोली लावलेल्या निविदा कशा चालतात असा प्रश्न उपस्थित करीत हा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीने परत पाठवला. याबाबतची सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले.

    मुंबई : मुंबईतील स्मशानभूमी, दफनभूमींची स्वच्छता करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी नेमण्यात येणाऱ्या कंत्राट कामांसाठी चक्क उणे ४६ टक्के कमी दरात बोली लावणाऱ्या कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र उद्यान आणि मैदानांच्या देखभालीमध्ये कमी बोली लावण्यात आल्याने निविदा रद्द करण्यात आल्या होत्या. मग स्मशानभूमींच्या कमी बोली लावलेल्या निविदा कशा चालतात असा प्रश्न उपस्थित करीत हा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीने परत पाठवला. याबाबतची सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले.

    मुंबईत एका बाजूला महापालिकेने केलेल्या अंदाजित रकमेपेक्षा कमी दरामध्ये भरलेल्या निविदा रद्द करुन, त्यांची इसारा रक्कम रद्द केली जात आहे. तर दुसरीकडे स्मशानभूमी आणि दफनभुमीच्या स्वच्छतेसाठी नेमण्यात येणाऱ्या कंत्राट कामांसाठी चक्क उणे ४६ टक्के कमी दरात बोली लावणाऱ्या कंत्राटदारांची नेमणूक प्रशासनाने केली आहे. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीत मंजुरीसाठी मांडण्यात आला होता. मुंबईतील ४२ स्मशानभूमींच्या स्वच्छता राखण्यासाठी चार विभागांसाठी पालिकेने निविदा काढल्या आहेत.

    या निविदांमध्ये एकमेव कंपनी पात्र ठरली असून, चक्क ४६ टक्के कमी दरात त्यांनी हे काम मिळवले आहे. यापूर्वी उद्यान आणि मैदानांच्या देखभालीमध्ये कमी बोली लावण्यात आल्याने निविदा रद्द करण्यात आल्या होत्या. मग स्मशानभूमींच्या स्वच्छतेसाठी कमी दरात लावलेल्या बोली कशा चालतात, असा प्रश्न आता उपस्थित करण्यात आला. त्यामुळे या प्रस्तावाबाबत प्रशासनाने सविस्तर माहिती न दिल्याने हा प्रस्ताव राखून ठेवण्यात आला. येत्या बैठकीत सविस्तर माहितीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश बुधवारी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले आहेत.

    काय आहे प्रस्ताव

    मुंबईतील स्मशानभूमी, दफनभूमी स्वच्छ राखण्यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत हाऊसकिपिंगच्या सेवेची वाढीव मुदत ३० सप्टेंबर २०२१ रोजी संपत आहे. त्यामुळे या कामांसाठी मागवलेल्या निविदा ३१ मे २०२१ रोजी उघडण्यात आल्या. यामध्ये प्रति चौरस फूट प्रति महिन्यासाठी १.६९ एवढा दर निश्चित करुन निविदा मागवण्यात आल्या होत्या. परंतु यामध्ये पात्र ठरलेल्या सिक्स सेन्स कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने ०.९१ एवढा दर लावला, तर अन्य कंपन्यांनी जास्त दर आकारला आहे. त्यामुळे कमी बोली लावणारी सिक्स सेन्स कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चार भागांमध्ये पात्र ठरली आहे. विशेष म्हणजे या कंपनीने अंदाजित दरापेक्षा चक्क ४६ टक्के कमी दराने काम मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.