Property dispute between former Shiv Sena minister Vijay Shivtare and his son; Girl's sensational post on Facebook!

  मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी राजकीय वैमनस्यातून कुटूंबिय अडचणीत येत असल्याचे पत्रात नमूद करत चर्चांना वाव करून दिला आहे. मात्र, दुसरीकडे शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे आणि त्यांच्या मुलामध्ये संपत्तीच्या वाद सुरू असल्याचे सांगत शिवतारे यांची कन्या ममता शिवतारे – लांडे यांनी फेसबूकवर पोस्ट आई आणि भावावर गंभीर आरोप केले आहेत, अशी चर्चा आहे.

  फेसबुक पोस्ट करत आई- भावावर गंभीर आरोप

  शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांच्यात आणि पत्नी- मुलामध्ये संपत्तीच्या वादातून वितुष्ट निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार शिवतारे यांची कन्या ममता शिवतारे- लांडे यांनी सविस्तर फेसबुक पोस्ट करत आई- भावावर गंभीर आरोप केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यात फेसबूक पेजवर आपली अस्वस्थता व्यक्त करताना ममता शिवतारे – लांडे यांनी म्हटले आहे की, ‘माझ्या पित्याची माझ्याच भावाने संपत्तीच्या लोभापायी केलेली दयनीय अवस्था पाहून मी अत्यंत अस्वस्थ आहे.’

  कित्येक वर्ष असाच त्रास बाबांनी सहन केला

  ममता शिवतारे – लांडे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘माझा भाऊ विनय विजय शिवतारे काही कौटुंबिक वादातून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वीही कित्येक वर्ष असाच त्रास बाबांनी सहन केला. मात्र कधीही त्यावर प्रतिक्रिया दिली नाही, कारण त्यामुळे माझे भाऊ व त्यांच्या कुटुंबाला हानी पोहोचेल असे त्यांना वाटत होते, आजही वाटते,’ असे ममता यांनी पोस्ट केली आहे.

  सतत धमक्या देऊन मानसिक त्रास

  त्या पुढे म्हणतात की, ‘मागील वर्षी जानेवारी २०२० मध्ये अत्यंत गंभीर प्रकृती असताना त्यांची बायपास झाली डॉक्टरांनी त्यांच्या वाचण्याची शक्यता २० टक्के आहे असे सांगितले. ऑपरेशन यशस्वी झाले, मात्र त्यानंतरही जीवाला धोका असताना माझा मोठा भाऊ सतत धमक्या देऊन मानसिक त्रास देत होता. मागील दीड वर्षांपासून किडनीच्या आजारामुळे बाबा एक दिवसाआड डायलीसिसला जातात. या दीड वर्षात एकदाही माझ्या दोन्ही भावांपैकी कोणीही त्यांना भेटायला सुद्धा आले नाही. ते आहेत की नाही? याची सुद्धा विचारपूस केली नाही. त्यांची प्रकृती नाजूक असल्याने मानसिक दबाव अजून वाढवून, त्यांना कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरु झाले.’ असा आरोप ममता यांनी केला आहे.

  हृदयविकाराचा झटका आयसीयूमध्ये ऍडमिट

  ‘आजवर आयुष्यभर कमावलेली सगळी संपत्ती विनय, विनस आणि त्यांच्या कुटुंबाच्या नावे बाबांनी केली. तरीही जेजुरीतील इथेनॉल प्लांट नावावर करून देण्यासाठी वारंवार त्यांच्याकडून दबाव टाकण्यात येत आहे. मात्र मागील दोन महिन्यांपासून तो दबाव सोशल मीडियाद्वारे बदनामी करून सतत वाढवला जात आहे. सर्व संपत्ती नावावर करूनही मानसिक त्रास कमी होत नव्हता. तो आताही अश्याच बदनामीच्या धमक्या देत आहे,’ असेही ममता यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे. दरम्यान, ‘आज सर्व काही सहनशीलतेच्या पलीकडे गेले आहे आणि त्याच धक्क्याने त्यांना पहाटे हृदयविकाराचा झटका आला. आयसीयूमध्ये रात्री दोन वाजता मी त्यांना घेऊन आली व ऍडमिट केले,’ असेही त्यांनी म्हटले आहे.