मुंबईतील ४२ स्मशानभूमींच्या स्वच्छता राखण्यासाठी चार विभागांसाठी पालिकेने निविदा काढल्या आहेत. या निविदांमध्ये एकमेव कंपनी पात्र ठरली असून, चक्क ४६ टक्के कमी दरात त्यांनी हे काम मिळवले आहे.

    मुंबई: मुंबईतील स्मशानभूमी, दफनभूमींची स्वच्छता करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी नेमण्यात येणाऱ्या कंत्राट कामांसाठी चक्क उणे ४६ टक्के कमी दरात बोली लावणाऱ्या कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. निविदांमध्ये उणे ४६ टक्के दराच्या निविदेला बुधवारच्या स्थायी समितीत काँग्रेसने विरोध दर्शविला. मात्र विरोधाला न जुमानता चर्चा न करता स्थायी समिती अध्यक्ष्यांनी प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे संतापलेल्या विरोधकांनी सभात्याग केला.

    मुंबईत एका बाजूला महापालिकेने केलेल्या अंदाजित रकमेपेक्षा कमी दरामध्ये भरलेल्या निविदा रद्द करुन, त्यांची इसारा रक्कम रद्द केली जात आहे. तर दुसरीकडे स्मशानभूमी आणि दफनभुमीच्या स्वच्छतेसाठी नेमण्यात येणाऱ्या कंत्राट कामांसाठी चक्क उणे ४६ टक्के कमी दरात बोली लावणाऱ्या कंत्राटदारांची नेमणूक प्रशासनाने केली आहे. याबाबतचा प्रस्ताव मागील स्थायी समितीतही मंजुरीसाठी मांडण्यात आला होता. मात्र कमी दराने बोली लावून निविदा काढल्याने तीव्र विरोध करण्यात आला. त्यामुळे हा प्रस्ताव राखून ठेवण्यात आला होता. बुधवारी, २९ सप्टेंबरला हा प्रस्ताव प्रशासनाने पुन्हा स्थायी समितीत मंजुरीसाठी ठेवला. यावेळी उणे ४६ टक्के कमी दराच्या प्रस्तावाला काँग्रेसने विरोध केला. मात्र बहुमताच्या जोरावर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी चर्चेविना प्रस्ताव मंजूर केला. काँग्रेसने या प्रस्तावाला असलेला विरोध कायम ठेवत सभात्याग केल्याचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सांगितले.

    मुंबईतील ४२ स्मशानभूमींच्या स्वच्छता राखण्यासाठी चार विभागांसाठी पालिकेने निविदा काढल्या आहेत. या निविदांमध्ये एकमेव कंपनी पात्र ठरली असून, चक्क ४६ टक्के कमी दरात त्यांनी हे काम मिळवले आहे. यापूर्वी उद्यान आणि मैदानांच्या देखभालीमध्ये कमी बोली लावण्यात आल्याने निविदा रद्द करण्यात आल्या होत्या. मग स्मशानभूमींच्या स्वच्छतेसाठी कमी दरात लावलेल्या बोली कशा चालतात, असा प्रश्न आता उपस्थित करण्यात आला. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याचे राजा यांनी सांगितले.

    काय आहे प्रस्ताव
    मुंबईतील स्मशानभूमी, दफनभूमी स्वच्छ राखण्यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत हाऊसकिपिंगच्या सेवेची वाढीव मुदत ३० सप्टेंबर २०२१ रोजी संपत आहे. त्यामुळे या कामांसाठी मागवलेल्या निविदा ३१ मे २०२१ रोजी उघडण्यात आल्या. यामध्ये प्रति चौरस फूट प्रति महिन्यासाठी १.६९ एवढा दर निश्चित करुन निविदा मागवण्यात आल्या होत्या. परंतु यामध्ये पात्र ठरलेल्या सिक्स सेन्स कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने ०.९१ एवढा दर लावला, तर अन्य कंपन्यांनी जास्त दर आकारला आहे. त्यामुळे कमी बोली लावणारी सिक्स सेन्स कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चार भागांमध्ये पात्र ठरली आहे. विशेष म्हणजे या कंपनीने अंदाजित दरापेक्षा चक्क ४६ टक्के कमी दराने काम मिळवले आहे.