अध्यक्षपदाच्या मार्गात ‘राजभवन’चा अडथळा; विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक तातडीने लावने अशक्य

‘नवराष्ट्र’ला मिळालेल्या विशेष माहितीनुसार राज्य मंत्रिमंडळाला आधी अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या संभाव्य तारखांचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे मान्यतेसाठी पाठवावा लागेल. त्यासाठी मंत्रीमंडळाची बैठक व्हावी लागेल. पण येत्या चार दिवसात तरी राज्य मंत्रीमडंळाची बैठकच होणार नाही. विधिमंडळ अधिवेशनाच्या आधीची बैठक रविवारी होणार आहे.

  मुंबई : विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक तातडीने लावून घेणे महाविकास आघाडी सरकारला कदाचित शक्य होणार नाही, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी आज दिली. अध्यक्षांची निवड कऱण्याचा कार्यक्रम व वेळ ही राज्यपालांकडून निश्चित करण्यात येते. ती प्रक्रियाच अद्यापि सुरु झालेली नाही.
  नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता गेले सहा महिने हे पद रिक्तच असून राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे अध्यक्षपदाची प्रभारी जबाबदारी आहे.

  काँग्रेसच्या काही नेत्यांची अशी समजूत होती की “उपाध्यक्ष हेच अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर करू शकतात व ते कधीही करता येईल़ ’’ अशा समजुतीत नेत्यांनी येत्या सोमवारी व मंगळवारी होणाऱ्या दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनातच अध्यक्षपदी एका काँग्रेस आमदाराची निवड केली जाईल असा घाट घातला होता. मात्र त्यात अनेक तांत्रिक मुद्दे असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

  ‘नवराष्ट्र’ला मिळालेल्या विशेष माहितीनुसार राज्य मंत्रिमंडळाला आधी अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या संभाव्य तारखांचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे मान्यतेसाठी पाठवावा लागेल. त्यासाठी मंत्रीमंडळाची बैठक व्हावी लागेल. पण येत्या चार दिवसात तरी राज्य मंत्रीमडंळाची बैठकच होणार नाही. विधिमंडळ अधिवेशनाच्या आधीची बैठक रविवारी होणार आहे.

  राज्यपालांकडे प्रस्ताव पाठवल्यानंतर त्यांच्याकडून विधिमंडळ सचिवालयाकडे सूचना येतील़ त्यानंतरच विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकेल. ही सारी प्रक्रिया येत्या सहा दिवसात पूर्ण कशी होणार असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे आता अध्यक्षपदाच्या मार्गात राजभवनाचाही एक अडथळा आहे याची जाणीव राजकीय वर्तुळाला झाली आहे.

  विदर्भाकडेच येणार पद?

  खरेतर अद्यापी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी कोणत्या आमदारांकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवायची याचा निर्णय़ दिलेला नाही. तसेच काँग्रेस नेत्यांनीही राष्ट्रवादी आणि शिवेसनेच्या वरिष्ठ नेतृत्वाशी त्या विषयी चर्चा केलेली नाही. तिन्ही पक्षांच्या नेत्यांचे एकमत नावावर झाल्यानंतरच निवडणुकीची घोषणा होऊ शकते. काँग्रेसमध्ये संग्राम थोपटे यांचे नाव जरी आघाडीवर असले तरी डॉ़ नितीन राऊत यांच्याकडे अध्यक्षपद सोपवून विदर्भाचा या पदावरील ह्क्क कायम ठेवावा, असा प्रयत्न पक्षातील कही वजनदार पुढारी करत आहेत. नाना पटोले यांना कोणते मंत्रीपद द्यायचे याचाही निर्णय अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वीच घेणे आवश्यक असल्याचेही मत एका वरिष्ठ नेत्याने नाव न घेण्याच्या अटीवर व्यक्त केले.