‘पुढील काळात निर्बंध वाढविण्याबाबत निर्णय घ्यावे लागणार’; राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य

मागील तीन दिवस दिलासादायक आकडेवारी पाहिल्यानंतर कालपासून अचानक रूग्णसंख्येत वाढ पहायला मिळाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लसीकरणावर भर देण्यासाठी मुबलक प्रमाणात लस पुरवठा होणे आवश्यक आहे.

  मुंबई : देशात अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणायची असेल तर कोरोनाची सध्याची परिस्थिती लक्षात घेता लॉकडाऊन लागणार नाही. मात्र, स्थानिक पातळीवर कंटेन्मेंट झोन तयार करुन या आजाराला आळा घालण्याची गरज असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी म्हटले आहे. तीस राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी आढावा बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याऐवजी आरोग्यमंत्री राजेश टोपे बैठकीत सहभागी झाले होते.

  मुबलक प्रमाणात लस पुरवठा होणे आवश्यक

  या बैठकीची माहिती देताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, मागील तीन दिवस दिलासादायक आकडेवारी पाहिल्यानंतर कालपासून अचानक रूग्णसंख्येत वाढ पहायला मिळाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लसीकरणावर भर देण्यासाठी मुबलक प्रमाणात लस पुरवठा होणे आवश्यक आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीत आणि आज पुन्हा एकदा आम्ही कोविशिल्डच्या ५० लाख तर कोवॅक्सिनच्या ४० लाख मात्रांची मागणी केली आहे.

  आर्थिक नुकसान टाळून निर्बंध लावण्याबाबत सूचना

  टोपे म्हणाले की, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपचाराच्या प्रक्रियेमुळे त्यांना आज बैठकीला हजर राहणे अशक्य होते. त्याबाबत पंतप्रधान कार्यालयाला कळविण्यात आले होते. सलग दोन तासांच्या या बैठकीमुळे त्यांनी मला या बैठकीला हजर राहण्याची सूचना केली होती, असे टोपे म्हणाले. मात्र, या बैठकीत केवळ आठ मुख्यमंत्र्यांना म्हणणे मांडायची संधी मिळाल्याचे ते म्हणाले.

  यावेळी राज्य सरकारचे म्हणणे पंतप्रधान कार्यालयाला लेखी स्वरूपातही कळविण्यात आल्याची माहिती टोपे यांनी दिली. राज्यात आर्थिक नुकसान टाळून निर्बंध लावण्याबाबत सूचना पंतप्रधानांच्या बैठकीत करण्यात आल्या असून, त्यानुसार पुढील काळात निर्बंध वाढविण्याबाबत निर्णय घ्यावे लागणार आहेत.