The friend kept his word, showing greatness of mind; Congress' Rajni Patil thanked BJP

भाजपाने आपला उमेदवार मागे घेतला नसता आणि ठरल्यानुसार 4 ऑक्टोबरला जरी मतदानाची वेळ आली असती तरी भारतीय जनता पक्षाची स्थिती हात दाखवून अवलक्षण अशीच झाली असती किमान चाळीस मतांच्या फरकाने काँग्रेस उमेदवार रजनी पाटील याच विजयी झाल्या असत्या, असा विश्वास महा विकास आघाडीचे नेते व्यक्त करत आहेत.

  मुंबई : भाजपाने आपला उमेदवार मागे घेतला नसता आणि ठरल्यानुसार 4 ऑक्टोबरला जरी मतदानाची वेळ आली असती तरी भारतीय जनता पक्षाची स्थिती हात दाखवून अवलक्षण अशीच झाली असती किमान चाळीस मतांच्या फरकाने काँग्रेस उमेदवार रजनी पाटील याच विजयी झाल्या असत्या, असा विश्वास महा विकास आघाडीचे नेते व्यक्त करत आहेत.

  ती वेळ येऊ न देता आपली मूठ झाकलेलीच ठेवणे भाजपाने पसंत केले असून आता ते त्यात सव्वालाखाचे हिरे होते असे सागण्यास मोकळे झाले आहेत. कारण सध्याच्या विधानसभेतील अंकगणित भाजपा उमेदवाराच्या विजयासाठी अजिबातच अनुकूल नाही हे स्पष्ट झाल्यानंतर काँग्रेसने पुढे केलेला हात हाती घेत भाजपाने इभ्रत सुरक्षित राखली अशीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

  परंपरा जोपासल्याचा दावा

  अर्ज मागे घेण्याच्या कालच्या अखेरच्या दिवशी भाजपा उमेदवाराने माघार घेतल्यानंतर काँग्रेस उमेदवार रजनी पाटील यांनी सायंकाळी राज्यसभा निवडणूक बिनविरोध जिंकल्याचे प्रमाणपत्र घेतले व निवडणुकीची सारी प्रक्रिया पूर्ण झाली. राजीव सातव यांच्या अकाली कोरोना निधनानंतर राज्यसभा सदस्यपदाच्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार होती. त्यासाठी मुंबई भाजपाचे सचीव संजय उपाध्याय यांनी अर्ज दाखल केला होता. महाराष्ट्राच्या परंपरेनुसार ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली होती.

  …तर उपाध्याय यांचा पराभव अटळ होता

  या रिक्त जागी सातव कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला उमेदवारी मिळणे अपेक्षित असताना काँग्रेस श्रेष्ठींनी बीडच्या माजी खासदार माजी मंत्री रजनी पाटील यांना अचानक रिंगणात उतरवले. विशेष म्हणजे पाटील यांचे नाव राज्यपालांनी मान्य न केलेल्या बारा विधान पिरषद सदस्य यादीतही होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे तसेच अपक्ष अशा किमान 154 आमदारांनी पाटील यांना मतदान करणे अपेक्षित होते. भाजपा नेत्यांनी आधी निवडणूक अटीतटीची होईल असा दावा केला होता खरा, पण निवडणुकीत उपाध्याय यांचा पराभव होणे अटळ होते. कारण भाजपाकडे स्वतःची 106 तर अन्य लहान पक्ष व अपक्षांची अशी मिळून 119 मतेच झाली असती हे स्पष्ट होते. भाजपाचा उमेदवार पडला अशी चर्चा होऊ देणेही भाजपाला सध्याच्या वातावरणात परवडणारे नव्हतेच. त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी केलेल्या विनंतीला मान देण्याचा निर्णय भाजपा कोअर कमिटीने घेतला असे दिसते. मात्र भाजपाच्या 12 सदस्यांचे निलंबन लौकरात लौकर हटवण्याचे आश्वासन भाजपाने घेतले असावे अशी चर्चा आहे.