मुंबई भाजपचे सरचिटणीस संजय उपाध्याय यांना राज्यसभेची उमेदवारी; २२सप्टेंबर रोजी नामांकन दाखल करणार!

संजय उपाध्याय यांच्या राजकारणाची सुरुवात भाजयुमोपासून झाली. त्यानंतर ते भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर चिटणीस होते. आता ते भाजपचे मुंबई सरचिटणीस आहेत. तसेच उत्तर भारतीयांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपाध्याय यांना राज्यसभेवर पाठविण्यामागे भाजपची मुंबई महापालिकेची रण निती असल्याचे सांगण्यात येत आहे.

    मुंबई : कॉंग्रेसचे राज्यसभा सदस्य दिवंगत राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेवर कॉंग्रेसचा उमेदवार कोण ते अजून गुलदस्त्यात राहिले आहे. भारतीय जनता पक्षाने मात्र मुंबई भाजपचे सरचिटणीस संजय उपाध्याय हे राज्यसभेचे उमेदवार असतील अशी घोषणा केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यानी पुण्यात पत्रकाराना माहिती दिली की, येत्या २२ तारखेला सकाळी अकरा वाजता  उपाध्याय नामांकन अर्ज दाखल करणार आहेत.

    नामांकन अर्ज भरण्याची अंतिम तारीख २२ सप्टेंबर
    केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या सहा रिक्त जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यात महाराष्ट्र, तामिळना़डू, पश्चिम बंगाल, आसाम आणि मध्य प्रदेशातील रिक्त जागांवर ही निवडणूकीसाठी अधिसूचना १५ सप्टेंबरला जारी करण्यात आली आहे. या जागांसाठी नामांकन अर्ज भरण्याची अंतिम तारीख २२ सप्टेंबर निश्चित आहे. तर ४ ऑक्टोबरला मतदान होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर होईल. पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, आसाम, मध्यप्रदेशमधील एका जागेवर निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. तर, तामिळनाडूमधील दोन जागांवर निवडणूक पार पडेल. काँग्रेसचे राजीव सातव यांना कोरोना संसर्ग झाल्याने पुण्याच्या जहांगीर रुग्णालयात १६ मे रोजी त्यांचे निधन झाल्याने राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे.

    भाजपची मुंबई महापालिकेची रणनिती