राकेश वाधवानची खासगी रुग्णालयात उपचाराची विनंती नाकारली; खाजगी डॉक्टरांच्या पथकाला तपासणी करण्यास उच्च न्यायालयाची मूभा

अटकेत असलेल्या राकेश वाधवानाची तब्येत खालावल्याने पालिकेच्या के ई एम रुग्णालयात एप्रिल महिन्यात दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय कारणास्तव आपल्याला जामीन देण्यात यावा, अथवा खासगी रुग्णालयात उपचाराची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका वाधवानने उच्च न्यायालयात केली आहे.

    मुंबई: पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेला एचडीआयएलचा प्रमोटर राकेश वाधवानला वैद्यकीय उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यास शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. मात्र, खासगी डॉक्टरांच्या पथकाला जे. जे रुग्णालयात देऊन त्याची तपासणी करण्याची मूभा खंडपीठाने दिली आहे.

    पंजाब अँण्ड महाराष्ट्र सहकारी बँकेच्या ४३५५ कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी एचडीआयएलचे व्यवस्थापकीय संचालक सारंग वाधवान आणि कंपनीचे प्रमोटर राकेश वाधवान, दलजीत सिंग पाल, गुरुंनाम सिंग होठी यांच्यासह इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेत असलेल्या राकेश वाधवानाची तब्येत खालावल्याने पालिकेच्या के ई एम रुग्णालयात एप्रिल महिन्यात दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय कारणास्तव आपल्याला जामीन देण्यात यावा, अथवा खासगी रुग्णालयात उपचाराची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका वाधवानने उच्च न्यायालयात केली आहे.

    त्या याचिकेवर शुक्रवारी न्या. भारती डांगरेंसमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, याचिकाकर्त्यांची तब्येत खराब असून के ई एम रुग्णालयात त्यांची योग्यपद्धतीने काळजी घेण्यात येत नाही. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी वाधवानच्यावतीने ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी खंडपीठाकडे केली. त्याला सरकारी वकिलांनी तीव्र विरोध केला. त्यावर न्यायालयाने खाजगी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाद्वारे तपासणी करण्याची परवानगी याचिकाकर्त्यांना देत वाधवान यांचा वैद्यकीय अहवाल पुढील सुनावणीदरम्यान सादर करण्याचे सरकारला निर्देश देत सुनावणी २४ सप्टेंबरपर्यंत तहकूब केली.