कर्मचार्‍यांच्या आधार कार्डवर रुग्णांची नोंदणी; आगीचे गांभीर्य लक्षात घेत कोविड सेंटर प्रमुखांचा निर्णय

मुंबई येथील भांडूपमधील ड्रिम मॉलमध्ये लागलेल्या आगीत सापडलेल्या रुग्णांना अग्निशमन दलाचे जवानानी बाहेर काढल्यानंतर त्यांना तातडीने मुलुंडमधील जम्बो कोविड सेंटरमध्ये नेण्यात आले. कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांना दाखल करता आधार कार्ड बंधनकारक असते.

    मुंबई (Mumbai).  भांडूपमधील ड्रिम मॉलमध्ये लागलेल्या आगीत सापडलेल्या रुग्णांना अग्निशमन दलाचे जवानानी बाहेर काढल्यानंतर त्यांना तातडीने मुलुंडमधील जम्बो कोविड सेंटरमध्ये नेण्यात आले. कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांना दाखल करता आधार कार्ड बंधनकारक असते; मात्र परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत कोविड सेंटरमधील कर्मचार्‍यांच्या आधार कार्डवरच त्यांना जम्बो सेंटरमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती मुलुंड जम्बो कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. प्रदीप आंग्रे यांनी दिली.

    सनशाईन रुग्णालयात असलेल्या कोविड रुग्णांना तातडीने मुलुंडमधील जम्बो कोविड सेंटरमध्ये आणण्यात आले. कोविड सेंटरमध्ये रुग्णांना दाखल करण्यासाठी त्यांचे आधार कार्ड बंधनकारक आहे. आधार कार्डद्वारे त्यांची नोंदणी केली जाते. मात्र आगीत सापडलेल्या 30 कोविड रुग्णांना कोविड सेंटरमध्ये आणण्यात आले. त्यावेळी त्यांची परिस्थिती फारच नाजूक होती. त्यांना श्वास घेण्यास त्रास होणे, भीतीचे वातावरण यामुळे त्यांच्यावर तातडीने उपचार करणे आवश्यक होते. परिस्थितीचे गांर्भीर्य लक्षात घेता कोविड सेंटरमधील कर्मचार्‍यांच्या आधार कार्डद्वारे रुग्णांची नोंदणी करून त्यांना दाखल करत त्यांच्यावर उपचार केले.

    दाखल करण्यात आलेल्या रुग्णांपैकी एकाची परिस्थिती फारच गंभीर असल्याने त्याला सेव्हन हिल्स रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आले आहे. तर एकाचा मृत्यू झाला. मात्र उर्वरित 27 रुग्णांची परिस्थिती उत्तम आहे. रुग्णांची मानसिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना त्यांच्या निवडीनुसार खासगी रुग्णालयात स्थलांतरित करण्यात येईल, अशी माहिती मुलुंड कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. प्रदीप आंग्रे यांनी सांगितले.