देशातल्या ४ मोठ्या सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेने उगारला कारवाईचा बडगा,मुंबईतील ‘या’ २ बँकांचा समावेश

भारतीय रिझर्व्ह बँकेने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी देशातील चार बड्या सहकारी बँकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये मुंबईतील सारस्वत सहकारी बँक (Saraswat Co-operative Bank Ltd) आणि एसव्हीसी सहकारी बँकेचा (SVC Bank) समावेश आहे.

    मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी देशातील चार बड्या सहकारी बँकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये मुंबईतील सारस्वत सहकारी बँक (Saraswat Co-operative Bank Ltd) आणि एसव्हीसी सहकारी बँकेचा (SVC Bank) समावेश आहे. रिझर्व्ह बँकेने या दोन्ही बँकांना अनुक्रमे २५ लाख आणि ३७.५० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर उर्वरित दोन बँकांमध्ये आंध्र प्रदेशातील महेश को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक आणि अहमदाबादच्या मर्केंटाइल को-ऑपरेटिव बँकेचा समावेश आहे. यापैकी महेश को-ऑपरेटिव अर्बन बँकेला १ कोटी १२ लाख ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर मर्केंटाइल सहकारी बँकेला ६२.५० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

    या चारही बँकांनी रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले होते. यापैकी एसव्हीसी बँकेने ठेवींवर देण्यात येणारे व्याज आणि आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी घालून देण्यात आलेल्या नियमांची पायमल्ली केली. तर सारस्वत बँकेकडूनही ठेवींवरील व्याजदर आणि इतर नियमांचे पालन न केल्याचा ठपका रिझर्व्ह बँकेकडून ठेवण्यात आला आहे.काही दिवसांपूर्वीच रिझर्व्ह बँकेने राज्यातील तीन सहकारी बँकांना दंड ठोठावला होता. यापैकी मोगावीरा सहकारी बँकेला १२ लाख, इंदापुर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला ((Indapur Urban Cooperative Bank) १० लाख आणि बारामती सहकारी बँक लिमिटेडला (The Baramati Sahakari Bank Limited) एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. तत्पूर्वी रिझर्व्ह बँकेने नियमांचे पालन न केल्याप्रकरणी गुजरातमधील ध्रांगधरा पीपल्स को-ऑपरेटिव बँकेला दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. याशिवाय, बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेलाही रिझर्व्ह बँकेने ६ कोटींचा दंड ठोठावला होता.