नवरात्रोत्सवातील भपकेबाज गरब्यावर निर्बंध, मूर्तीची उंचीची मर्यादा 4 फूट

'उत्सवात गरब्याचे आयोजन केले जावू नये. तसेच, आरती, भजन किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे तरतुदींचे पालन करण्यात यावे.गरबा, सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम उदा. रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे. देवीमूर्तीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन करावी.' अशा सुचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत.

    मुंबई – कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला असून नवरात्रोत्सवात रात्रभर रंगणाऱ्या गरब्यावर पालिकेने निर्बंध लावले आहेत. उत्सवात रोषणाई, तसेच भव्य देखावे करू नयेत, गरब्याचे आयोजन करू नये. देवीची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूट व घरगुती मूर्तीकरिता २ फूटांपेक्षा जास्त उंचीची नसावी, मंडपात पाच पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी उपस्थित राहू नये. अशा मार्गदर्शक सुचना पालिकेने उत्सवानिमित्त जारी केल्या आहेत.

    मुंबईत नवरात्रोत्सव दरवर्षी मोठ्या जल्लोषात साजरा होतो. मात्र, गेल्या वर्षीपासून या उत्सवावर कोरोनामुळे निर्बंध आले आहेत. येत्या 7 ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला असून तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवानिमित्त जल्लोषात साजऱ्या होणाऱ्या गरब्यावरही पालिकेने निर्बंध आणले आहेत.

    सार्वजनिक मंडळांच्या देवीच्या मूर्तीची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी. नवरात्रौत्सवादरम्यान गरब्याचे आयोजन केले जावू नये. आरती, भजन, किर्तन, नवरात्रौत्सवादरम्यान धार्मिक, भक्तीपर, आदी गर्दी  होणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन टाळावे. कोराना विषाणूची गंभीर आपत्ती लक्षात घेता गर्दी होवू नये म्हणून मंडप सजावट, रोपणाई, देखावे करू नयेत. त्याचप्रमाणे गरब्याचे आयोजन करू नये, असे निर्बंध घालण्यात आले आहेत. त्याबाबत मार्गदर्शक सुचना पालिकेने जारी केल्या आहेत.

    मूर्तीची चार फूटांची मर्यादा

    नवरात्रोत्सवात प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या सार्वजनिक मंडळांसाठी मूर्तींची मर्यादा ४ फूट आणि घरगुती मूर्ती २ फूटांपेक्षा जास्त उंचीची नसावी अशी मर्यादा घालण्यात आली आहे. सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी नवरात्रोत्सव मंडळांना पालिकेची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहिल. त्यासाठीची ऑनलाईन परवानगी यंत्रणा तयार करून ती 23 सप्टेंबर पर्यंत कार्यान्वीत करणे आवश्यक आहे. परवानगी विनाशुल्क देण्यात येणार आहे.

    मूर्तीचे घरीच विसर्जन करा

    प्लास्टरच्या मूर्तीऐवजी घरातील धातू संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची, पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. जेणेकरून आगमन,  विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळून स्वतःचे आणि कुटुंबियांचे कोरोनापासून संरक्षण करणे शक्य होईल. घरी विसर्जन करता येणे शक्य नसल्यास नजिकच्या नैसर्गिक विसर्जनस्थळी विसर्जन करावे.

    मिरवणूका नकोत

    घरगुती मुर्तीचे आगमन, विसर्जन मिरवणूकीच्या स्वरूपाचे नसावे. आगमनासाठी जास्तीत जास्त ५ व्यक्तींचा समूह असावा, त्यांनी लसींचे दोन डोस घेतलेले असावेत. मास्क आणि सुरक्षा घ्यावी, सार्वजनिक देवमूर्तीच्या आगमनावेळी व विसर्जनावेळी १० पेक्षा अधिक लोक असणार नाहीत.

    गरब्याला परवानगी नाही

    उत्सवात गरब्याचे आयोजन केले जावू नये. तसेच, आरती, भजन किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे तरतुदींचे पालन करण्यात यावे. गरबा, सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम उदा. रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे. देवीमूर्तीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन करावी

    निर्जंतूकीकरण आवश्यक

    मंडपाच्या मुख्य भागांचे दिवसांतून तीन वेळा निर्जंतुकीकरण करावे, तसेच कार्यकर्ते आणि इतर व्यक्ती यांना वापरासाठी उपलब्ध करून द्यावेत. मंडपात एका वेळी ५ पेक्षा जास्त कार्यकर्ते उपस्थित राहू नयेत याची खबरदारी घ्यावी.

    आरतीसाठी फक्त दहाजण

    देवीच्या आरतीच्या वेळी मंडपात दहा पेक्षा जास्त कार्यकर्ते, भाविक उपस्थित असू नयेत. कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. चाळीतील, इमारतीतील सर्व घरगुती देवीमूर्ती एकत्रितरित्या विसर्जनास नेऊन गर्दी करण्यास परवानगी असणार नाही.