सिद्धीविनायक मंदिर
सिद्धीविनायक मंदिर

१ जानेवारी रोजी नव वर्षाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असल्याने भाविकांसाठी प्रति तास २०० ऐवजी ८०० भाविकांना बाप्पाचे दर्शन घेता येणार आहे. QR कोड असलेल्या भाविकांनाच या दर्शन सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

मुंबई : कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वधर्मीय धार्मिक स्थळांवर निर्बंध लादण्यात आले होते़. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर तासाला २०० भाविकांनाच दर्शन घेता येत होते़. आता नववर्षाच्या पहिल्याच दिवशी तासाला ८०० भाविकांना बाप्पाचे दर्शन घेता येणार आहे़

भाविकांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे. सिद्धिविनायक मंदिर न्यासाने भाविकांसाठी ही दिलासा देणारी बातमी दिली आहे. १ जानेवारी रोजी नव वर्षाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असल्याने भाविकांसाठी प्रति तास २०० ऐवजी ८०० भाविकांना बाप्पाचे दर्शन घेता येणार आहे. QR कोड असलेल्या भाविकांनाच या दर्शन सुविधेचा लाभ घेता येणार आहे. ज्यांनी QR कोड घेतलेला नसेल त्यांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार नाही. दर्शनाची वेळ सकाळी ७ ते दुपारी १२ आणि दुपारी १२.३० ते संध्याकाळी ७ तसेच रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार आहे.

राज्यात कोरोनाचा संसर्ग निर्माण झाल्याने राज्यातील सर्व व्यवहार बंद करण्यात आले होते. लॉकडाऊन करण्यात आल्याने मंदिरे आणि प्रार्थनास्थळेही बंद ठेवण्यात आले होते. तब्बल नऊ महिने राज्यातील मंदिरे बंद होती. ही मंदिरे सुरू करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी, भाजप, मनसेपासून ते राज्यातील अध्यात्मिक संघटनांनीही आंदोलन केले होते. मात्र, कोरोनाचा संसर्ग पाहता सरकारने मंदिर सुरू करण्यास नकार दिला होता.

मात्र, कोरोनाचा संसर्ग कमी होताच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सरकारने मंदिरे सुरू करून भाविकांना मोठा दिलासा दिला होता. त्यामुळे राज्यातील सर्व मंदिरं भाविकांसाठी खुली झाली होती. १५ नोव्हेंबर रोजी सिद्धीविनायक मंदिरही भाविकांसाठी सुरू झाले असून सध्या तासाला दररोज २०० भाविकांना दर्शनाचा लाभ देण्यात येत आहे. फक्त १ जानेवारी रोजी ही संख्या २०० ऐवजी ८०० करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांना आताच दर्शनासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे.