जोगेश्वरी भागातील विविध प्रलंबित कामांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

जोगेश्वरी येथे मनपा कार्यालयासाठी नवी इमारत अशा विषयांवर मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली व सुचना दिल्या.

मुंबई:जोगेश्वरी भागातील विविध प्रलंबित कामांच्या प्रगतीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल घेतला. वर्षा येथील समिती कक्षात झालेल्या बैठकीस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र वायकर, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान सचिव पशुसंवर्धन व दुग्धविकास अनुप कुमार, मनपा आयुक्त इक्बालसिंह चहल, पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील आदींची उपस्थिती होती.

जोगेश्वरी व अंधेरी महाकाली गुंफांचा विकास, आरे कॉलनी येथील संरक्षित पात्र झोपडीधारकांचे पुनर्वसन, छोटा काश्मीर, आरे उद्यान येथे पर्यटन विकास करणे, जोगेश्वरी पोलीस ठाण्याचे सक्षमीकरण करणे, आरे शासकीय रुग्णालय महानगरपालिकेकडे हस्तांतरित करणे, आरे डेअरी पूर्ववत सुरु करणे, फोर्स वन हद्दीतील केल्टी पाडा व चाफ्याचा पाडा येथील आदिवासींचे पुनर्वसन करणे, जोगेश्वरी येथे मनपा कार्यालयासाठी नवी इमारत अशा विषयांवर मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली व सुचना दिल्या.