हे म्हणजे ‘पेशंट दगावल्यावर डॉक्टर येणं’; रोहित पवार यांची केंद्र सरकारवर टीका

राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दोन महिन्यांनी येत असलेलं केंद्राचं पथक म्हणजे पेशंट दगावल्यावर डॉक्टर येणं असला प्रकार आहे. केंद्र सरकारने अन्नदात्याची अशी चेष्टा करु नये. आता पथक नको तर मदत पाठवा असं ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.

मुंबई : राज्यातील अतिवृष्टीला दोन महिने उलटून गेले आहेत. त्यानंतर केंद्राचं पथक पाहणीसाठी येतं आहे. यावरुन  राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत टीका केली.

राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दोन महिन्यांनी येत असलेलं केंद्राचं पथक म्हणजे पेशंट दगावल्यावर डॉक्टर येणं असला प्रकार आहे. केंद्र सरकारने अन्नदात्याची अशी चेष्टा करु नये. आता पथक नको तर मदत पाठवा असं ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.

सोमवारी केंद्राचं पथक राज्यात दाखल झाले आहे.  २६ डिसेंबर ते पाहणी करणार आहे. ऑक्टोबर महिन्यात जो पाऊस झाला आणि त्यामुळे शेतकऱ्याचं जे नुकसान झालं त्याची पाहणी करायला हे पथक आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २३ ऑक्टोबरला जनतेला संबोधित करताना सांगितलं होतं की अवकाळी पावसामुळे राज्यातील ४१ लाख हेक्टवरील क्षेत्राचं नुकसान झालं आहे आम्ही केंद्राला तीनवेळा विनंती केली होती. मात्र पथक आलं नाही असं त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं. आता केंद्र सरकारचं पथक राज्यात दाखल झालं आहे.