तांत्रिक कारणांमुळे प्रवेश निश्चित करण्यात अडचणी; आरटीई प्रवेशास ९ जुलैपर्यंत मुदतवाढ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरटीई प्रवेशांतर्गत बालकांचे प्रवेश घेण्यात पालकांना अनेक अडचणी येत आहेत. अनेक पालक हे मूळ गावी असल्याने त्यांना शाळेत जाऊन प्रवेश घेता येत नाही. त्यामुळे पहिल्या यादीतील बालकांच्या प्रवेशासाठी पालकांना ऑनलाईन प्रवेश निश्चित करण्याची मुभा दिली आहे. त्यानंतर पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश घेण्याची मुदत ३० जून देण्यात आली होती.

    मुंबई : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार २०२१-२२ या चालू शैक्षणिक वर्षामध्ये आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी निवड यादीतील बालकांचे प्रवेश घेण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत होती. मात्र ओटीपीच्या तांत्रिक कारणांमुळे प्रवेश निश्चित करण्यात अडचणी येत आहेत. ही बाब लक्षात घेऊन शिक्षण संचालनालयाकडून प्रवेश निश्चित करण्यासाठी ९ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरटीई प्रवेशांतर्गत बालकांचे प्रवेश घेण्यात पालकांना अनेक अडचणी येत आहेत. अनेक पालक हे मूळ गावी असल्याने त्यांना शाळेत जाऊन प्रवेश घेता येत नाही. त्यामुळे पहिल्या यादीतील बालकांच्या प्रवेशासाठी पालकांना ऑनलाईन प्रवेश निश्चित करण्याची मुभा दिली आहे. त्यानंतर पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश घेण्याची मुदत ३० जून देण्यात आली होती.

    परंतु गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना मिळणाऱ्या ओटीपी मेसेजमध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे ऑनलाईन प्रवेश निश्चित करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे यादीतील बालकांना प्रवेश घेण्यासाठी आणि गटशिक्षणाधिकारी यांना ऑनलाईन प्रवेश निश्चित करण्यासाठी ९ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण संचालनालयातर्फे घेण्यात आला आहे.

    तसेच अद्यापही ज्या पालकांना प्रवेशासाठी शाळांमध्ये जाणे शक्य झाले नाही किंवा ज्या पालकांना अजूनही लॉटरी लागल्याचे कळले नाही. त्यांना एसएमएस करून शाळेत प्रवेश घेण्यासंदर्भात कळवण्यात यावेत असे आदेश शिक्षण संचालनालयाचे संचालक द.गो. जगताप यांनी राज्यातील जिल्हा परिषद आणि सर्व महापालिका प्रशासन आणि शिक्षणाधिकार्‍यांना दिले आहेत. त्यामुळे प्रवेश घेण्यात अडचणी येत असलेल्या पालकांना प्रवेशासाठी आणखी एक संधी मिळाली आहे.