सचिन वाझे फरार होण्याची एनआयएला भीती…. नजर कैदेत ठेवण्याच्या अर्जाला विरोध

अंबानी घराबाहेरील स्फोटकं(Antilia Case) आणि मनसूख हिरेन प्रकरणात अटक करण्यात आलेल्या बडतर्फ सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझेने(Sachin Waze) ह्रदयावर शस्त्रक्रिया (ओपन हार्ट) झाल्यानंतर पूर्णपणे बरं वाटेपर्यंत घरातच नजर कैदेत ठेण्यात यावे, अशी मागणी करणारा अर्ज केला आहे. त्या अर्जाला सोमवारी राष्ट्रीय तपास यंत्रणा(एनआयए)ने विरोध केला. वाझेला घरात नजर कैदेत ठेवल्यास तो फरार होऊ शकतो, असा दावा एनआयएकडून कऱण्यात आला.

    मुंबई : अंबानी घराबाहेरील स्फोटकं(Antilia Case) आणि मनसूख हिरेन प्रकरणात अटक करण्यात आलेल्या बडतर्फ सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझेने(Sachin Waze) ह्रदयावर शस्त्रक्रिया (ओपन हार्ट) झाल्यानंतर पूर्णपणे बरं वाटेपर्यंत घरातच नजर कैदेत ठेण्यात यावे, अशी मागणी करणारा अर्ज केला आहे. त्या अर्जाला सोमवारी राष्ट्रीय तपास यंत्रणा(एनआयए)ने विरोध केला. वाझेला घरात नजर कैदेत ठेवल्यास तो फरार होऊ शकतो, असा दावा एनआयएकडून कऱण्यात आला.

    उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आल्याच्या तसेच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेनच्या अचानक मृत्यूप्रकरणी गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे, त्यांचा सहकारी रियाझ काझी आणि पोलीस निरिक्षक सुनील माने यांना एनआयएकडून अटक करण्यात आली.

    तळोजा कारागृहात असलेल्या वाझेला ह्रद्यासंबंधित त्रास असल्याने ३० ऑगस्टला भिवंडी येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे वैद्यकीय उपचार केल्यानंतर त्यांच्यावर ओपन हार्ट शस्त्रक्रिया करण्याची गरज निर्माण झाल्याने मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुणालयात त्याच्यावर १४ सप्टेंबर रोजी शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर वाझेने विशेष सत्र न्यायालयात वकिलांमार्फत अर्ज दाखल केला असून शस्त्रक्रिया झाल्यापासून पूर्णपणे बरे होईपर्यंत आपल्याला घरातच नजरकैदेत ठेवावे अशी विनंती अर्जातून कऱण्यात आली आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने एनआयएला त्यावर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते.

    त्यानुसार सोमवारी विशेष न्यायायलयात न्या. ए. टी. वानखेडे यांच्यासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, एनआयएने वाझेचा अर्जाला विरोध केला. वाझेला घरातच नजर कैदेत ठेवल्यास तो फरार होण्याची शक्यताही बोलून दाखवली. तसेच तळोजा कारागृहात त्याच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी सर्व आधुनिक सुविधांची सोय करण्यात आली असल्याची माहिती एनआयएच्यावतीने देण्यात आली. त्याची दखल घेत न्यायालयाने वाझेचा वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर करण्याचे निर्देश रुग्णालय प्रशासनाला देत सुनावणी २९ सप्टेंबरपर्यत तहकूब केली.