बोगस लस प्रकरणी दहा जणांना अटक; एसआयटीमार्फत घोटाळ्याची चौकशी

मुंबईत सुमारे 2 हजार लोकांना बोगस लसी देण्यात आल्याचे समोर आले असून आतापर्यंत 5 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी एकूण 10 जणांना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींमध्ये शिवम हॉस्पिटलचे डॉक्टर शिवराज पटारिया आणि निता पटारिया यांचाही समावेश आहे. आरोपींकडून सुमारे 12 लाख रुपये जप्त करण्यात आलेत. धक्कादायक म्हणजे लसीऐवजी या भामट्यांनी चक्क सलाईनचे पाणी दिल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.

    मुंबई : मुंबईच्या विविध भागात सुरू असलेल्या लसीकरण घोटाळ्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कांदिवलीच्या हिरानंदानी सोसायटीपाठोपाठ बोरिवली, खार, वर्सोवा आणि परळमध्येही बोगस लसीकरणाचे प्रकार उघडकीस आलेत. त्यामुळे पोलिस तसेच सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.

    सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. गुन्ह्यांची व्याप्ती पाहता विशेष एसआयटी स्थापन केली आहे, असे नांगरे पाटील म्हणाले. बोगस लसीच्या चौकशीसाठी पोलिस उपायुक्त विशाल ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी (एसआयटी) स्थापन करण्यात आली आहे.

    मुंबईत सुमारे 2 हजार लोकांना बोगस लसी देण्यात आल्याचे समोर आले असून आतापर्यंत 5 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी एकूण 10 जणांना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींमध्ये शिवम हॉस्पिटलचे डॉक्टर शिवराज पटारिया आणि निता पटारिया यांचाही समावेश आहे. आरोपींकडून सुमारे 12 लाख रुपये जप्त करण्यात आलेत. धक्कादायक म्हणजे लसीऐवजी या भामट्यांनी चक्क सलाईनचे पाणी दिल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.

    कांदिवलीच्या हिरानंदानी हेरिटेज हाऊसिंग सोसायटीत सर्वात आधी बोगस लसीकरण घोटाळा उघडकीस आला. त्यानंतर बोरिवलीच्या आदित्य कॉलेज आणि शिंपोली परिसरातील मानसी शेअर्स अॅण्ड स्टॉक अॅडव्हर्टायझर्स कंपनीनं आयोजित केलेल्या शिबिरात बोगस लसी देण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.