सातारा, सांगली, रत्नागिरी, जळगाव, धुळे आणि… महाविकास आघाडीला मोठे यश पण भाजपाला राष्ट्रवादीची साथ?

राजकारणाचे जोडे सहकारात बाहेर काढले जात असले तरीही यावेळी पक्षीय अभिनिवेषात झालेल्या जिल्हा सहकारी बँकांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्र आणि सहकारावर वर्चस्व सिद्ध केले. राष्ट्रवादीच्या या यशामुळे महाविकास आघाडीचे पारडे जड झालेले दिसत असून भाजपाची मात्र चांगलीच पिछेहाट झाली आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या सांगली, सातारा, धुळे, नंदुरबार जिल्हा बँकांच्या निकालांनी हे स्पष्ट केले आहे(Satara, Sangli, Ratnagiri, Jalgaon, Dhule and ... Mahavikas Aghadi success but BJP with NCP support).

  मुंबई : राजकारणाचे जोडे सहकारात बाहेर काढले जात असले तरीही यावेळी पक्षीय अभिनिवेषात झालेल्या जिल्हा सहकारी बँकांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्र आणि सहकारावर वर्चस्व सिद्ध केले. राष्ट्रवादीच्या या यशामुळे महाविकास आघाडीचे पारडे जड झालेले दिसत असून भाजपाची मात्र चांगलीच पिछेहाट झाली आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या सांगली, सातारा, धुळे, नंदुरबार जिल्हा बँकांच्या निकालांनी हे स्पष्ट केले आहे(Satara, Sangli, Ratnagiri, Jalgaon, Dhule and … Mahavikas Aghadi success but BJP with NCP support).

  सांगलीत आघाडी विरुद्ध भाजपा

  सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी सरळ लढत होती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील तसेच काँग्रेसचे नेते कृषिराज्यमंत्री विश्वजीत कदम यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती. यात महाविकास आघाडीने तीन जागा बिनविरोध जिंकल्या. निकालानंतर राष्ट्रवादी 9, काँग्रेस 5, शिवसेनेचा 3 जागांवर विजय झाला. तर भाजपला केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले.

  भाजपाला राष्ट्रवादीची साथ?

  सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपची छुपी युती असल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळेच एकूण 21 जागांपैकी राष्ट्रवादीला 14, भाजपला 3 जागा मिळाल्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोरांना 3 व शिवसेनेला 1 जागा मिळाली. मतदानापूर्वीच 11 जागा बिनविरोध निवडून आल्या. तर 10 जागांसाठी मतदान झाले. रामराजे नाईक निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, दत्तानाना ढमाळ, नितीन पाटील, अनिल देसाई, सुरेश बापू सावंत, लहुराज जाधव, आमदार मकरंद पाटील, राजेंद्र राजपुरे आणि शिवरुपराजे खर्डेकर हे बिनविरोध निवडून आले. पाटण तालुक्यातुन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा तर जावली तालुक्यातून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला. पाटण तालुक्यातून सत्यजितसिंह पाटणकर हे विजयी झाले आहेत. तर जावली तालुक्यातुन राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार ज्ञानदेव रांजणे विजयी झाले.

  कोकणात उदय सामंतांचे वर्चस्व

  रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर शिवसेनेचे मंत्री उदय सामंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तानाजीराव चोरगे यांच्या नेतृत्वाखाली सहकार पँनलने वर्चस्व निर्माण केले. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत निलेश राणे यांच्या पॅनलचा सुपडा साफ झाला. एकुण 21 जागांपैकी 18 जागांवर सामंत आणि चौरगे यांच्या पॅनलचे उमेदवार निवडुण आले. नीलेश राणे यांच्या समर्थकांना केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.

  जळगावात भाजप मैदानाबाहेर

  जळगाव जिल्हा बँक निवडणुकीवर भाजपाने बहिष्कार टाकल्याने 21 पैकी 20 जागांवर विजय मिळवित महाविकास आघाडी प्रणित सहकार पॅनलने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. भाजपाचे आमदार संजय सावकारे यांचा विजय आणि रावेर सोसायटी मतदारसंघातून माघार घेतलेल्या उमेदवाराचा विजय हे निकालाचे वैशिष्ट्य ठरले. दरम्यान, या निवडणुकीत एकनाथ खडसे विरुद्ध गिरीश महाजन अशी खरी लढत होती. राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजपच्या असंतुष्टांनी मिळून शेतकरी विकास पॅनल तयार केले होते. या पॅनेलचा धुव्वा उडाला. यात, राष्ट्रवादी काँग्रेसने 12, शिवसेना 6, कॉग्रेस 2, अपक्ष (भाजप) 1 असे उमेदवार विजयी झाले.

  धुळ्यात सर्वसमावेशक शेतकरी पॅनलची चलती

  धुळे नंदुरबार जिल्हा बँकेत सर्व समावेशक शेतकरी पॅनलचे 13 सदस्य निवडून आले तर किसान संघर्ष पॅनलचे चार सदस्य निवडून आले आहेत. यामुळे जिल्हा बँकेवर पुन्हा एकदा माजी आमदार अमरिश पटेल आणि जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांचेच वर्चस्व कायम राहीले आहे. या निवडणुकीत भाजपचे खासदार सुभाष भामरे यांचे भाऊ सुरेश पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. सुरेश पाटील यांचा महाविकास आघाडीचे शरद पाटील यांनी पराभव केला. शिवसेनेचे माजी आमदार असलेले शरद पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेस प्रवेश करून घर वापसी केली आहे.

  दिग्गजांना पराभवाचा धक्का

  सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपचे प्रकाश जमदाडे यांनी आमदार विक्रम सावंत यांचा पराभव केला. साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला. राष्ट्रवादीचे बंडखोर ज्ञानदेव रांजणे यांनीच त्यांचा पराभव केला. कोरेगाव तालुक्यात सुनील खत्री आणि शिवाजीराव महाडीक यांना समान मते पडल्याने चिठ्ठीचा आधार घेण्यात आला. तर कराडमधून सहकारमंत्री बाळासाहेब पाटील विजयी झाले असून उदयसिंह उंडाळकर यांचा पराभव झाला आहे. धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेच्या निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांचे भाऊ सुरेश पाटील यांचा पराभव झाला. नंदूरबारचे पालकमंत्री के. सी. पाडवी यांच्या अक्राणी मतदार संघातून शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी यांनी सेनेच्या दोन सदस्यांना निवडून आणल्याने मंत्री पाडवींनाही जोरदार धक्का बसला.